कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्चचे अनुदान तब्बल पाच महिन्यांनी उशिरांनी आॅगस्टच्या अखेरीस मिळाले. आता यावर्षीच्या पहिल्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालये आणि कर्मचाऱ्यांना लागली आहे. अनुदान वेळेत आणि राज्यातील सर्व ग्रंथालयांना समान पद्धतीने मिळावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाने केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ६८५ सार्वजनिक ग्रंथालये कार्यरत आहेत. त्यांना राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून वर्षाला सप्टेंबर आणि मार्च या दोन टप्प्यांत अनुदान मिळते. गेल्या वर्षीपासून शासनाने ग्रंथालयांचे अनुदान दीडपट केले आहे. अनुदान वाढवून ग्रंथालयांना दिलासा दिला. मात्र, अनुदान मिळविण्यासाठी ग्रंथालयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मार्चऐवजी आॅगस्टच्या अखेरीस मिळाले आहे. यंदाच्या पहिल्या टप्प्यातील अनुदान अद्यापही आलेले नाही. अनुदान लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्यावर्षीचे अनुदान उशिरा मिळाल्याने उधार, उसनवारी करून ग्रंथालय चालकांना ग्रंथ, पुस्तकांची खरेदी तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे लागले. शिवाय मार्चमध्ये खर्चाची पत्रके करताना त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, शिवाय दुष्काळी स्थितीचे कारण पुढे करून अनुदान वाटपात दुजाभाव करण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा संघाने केली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील ६८५ ग्रंथालये अडचणीत---राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या पहिल्या टप्प्यातील अनुदानासाठी ३४ कोटींचा निधी निश्चित केला आहे. दुष्काळी भागातील ग्रंथालयांना यातील ५० टक्के तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ग्रंथालयांना २५ ते ३० टक्के स्वरूपात अनुदान शासनाकडून दिले जाणार असल्याचे समजते. ते अयोग्य आहे. सर्व ग्रंथालयांना यावर्षीचे पहिल्या टप्प्यातील अनुदान वेळेत समान पद्धतीने मिळावे याबाबत शासनाला संघातर्फे लवकरच निवेदन दिले जाणार आहे.- तानाजीराव मगदूम, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघग्रंथालयांचे अनुदान अद्याप आलेले नाही. शिवाय त्याबाबतच्या काही सूचनादेखील मिळालेल्या नाहीत. सप्टेंबरअखेरीस अथवा आॅक्टोबरमध्ये अनुदान मिळण्याची शक्यता आहे.- उत्तम कारंडे, तांत्रिक सहायक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय
ग्रंथालयांना अनुदानाची प्रतीक्षा
By admin | Published: September 17, 2015 11:32 PM