कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरात सोमवारी ६० वर्षांवरील ११ नागरिकांना कोविशिल्डचा व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर, १९७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. लस अद्यापही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरणाचा वेग दिवसेंदिवस मंदावत चालला आहे. मुबलक लस पुरवठ्याची शहरवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र कसबा बावडा येथे ५०, महाडिक माळ येथे १००, सदर बाजार येथे ५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत एक लाख २४ हजार २४३ नागरिकांना पहिल्या डोसचे तर, ४५ हजार ३४५ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
परदेशात उच्च शिक्षण घेणयाकरिता जाणाऱ्या शहरातील विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांसाठी सोमवारी सावित्रीबाई फुले येथे विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४४ विद्यार्थ्यांना व ४३ दिव्यांग नागरिकांना लसीकरण करण्यात आले. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिला डोस ४१ व दुसरा डोस ३, तर दिव्यांग नागरिकांना पहिला डोस ३९ व दुसरा डोस ४ दिव्यांगांना कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले.