कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहराला पेट्रोल, डिझेल पुरवठा करणारे टँकर अंकली पूल आणि कोल्हापुरातील शिरोलीजवळ राष्ट्रीय महामार्ग सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत उभे आहेत. तर पेट्रोल उपलब्ध असणाऱ्या पंपांवर पेट्रोलसाठी सलग तिसऱ्या दिवशीही वाहनधारकांनी रांगा लावल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाच पेट्रोल देण्याचे आदेश देऊनही ते धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र काही पंपांवर होते.
गेल्या तीन दिवसांपासून पंचगंगेसह कृष्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे कोल्हापूरसह सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका कोल्हापुरात होणाऱ्या पेट्रोल, डिझेल वितरणालाही बसला आहे. जिल्ह्यात भिलवडी (सांगली) येथे विविध पेट्रोल कंपन्यांचे तेल डेपो आहेत. तेथून कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पेट्रोल पंपांना इंधन पुरवठा होतो. हा पुरवठा तीन दिवसांपासून पूर्णत: ठप्प झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ज्या पेट्रोल पंपावर साठा शिल्लक आहे, त्या ठिकाणी वाहनधारकांची गर्दी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर वाहनधारकांमध्ये पेट्रोल घेण्यासाठी हमरीतुमरी सुरु आहे. वाढते वाद व भांडणांमुळे पेट्रोलचे वितरण पोलीस बंदोबस्तात करावे लागत आहे. प्रत्येकाला १०० रुपयांचे पेट्रोल दिले जात आहे. शहरातील बहुतांशी पेट्रोल पंपांवरील उपलब्ध साठा रविवारी सायंकाळपर्यंत संपण्याची चिन्हे आहेत. नव्याने पुरवठा झाला नाही तर आज (सोमवारी) शहरात वाहनधारकांना पेट्रोल मिळणे अशक्य आहे.
कोट
अंकली व शिरोलीजवळ साडेबारा हजार लीटर क्षमतेचे एकूण २२ टँकर पाणी ओसरण्याच्या प्रतीक्षेत उभे आहेत. पाणी ओसरल्यानंतर ते शहरात दाखल होतील. त्यानंतर इंधन पुरवठा सुरळीत होईल.
- गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल डिलर असोसिएशन