कोल्हापूर : मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यभरातील आरटीओ एजंटांना ‘आरटीओ प्रतिनिधी’ म्हणून मान्यता द्यावी व परिवहन आयुक्तांचा दलाल मुक्तीचा आदेश रद्द करावा, या मागणीकरिता बुधवारी धरणे आंदोलन केले. कोल्हापुरातील आरटीओ एजंटही या आंदोलनात सहभागी झाल्याने दिवसभर प्रादेशिक परिवहन कार्यालय व परिसरात अभ्यगतांची तुरळक वर्दळ होती. २००० सालच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व एजंटांना ‘आरटीओ प्रतिनिधी’ म्हणून काम करण्यास मान्यता द्यावी व परिवहन आयुक्तांचा दलाल मुक्तीचा आदेश रद्द करावा, याकरिता राज्यातील आरटीओ एजंटांनी बुधवारी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले. राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या आरटीओ कार्यालयांतील एजंटांनी एकत्रित येत मुंबई येथे मंत्रालयावर धडक मारण्याचा व आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला होता. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातील २५० हून अधिक एजंट मंगळवारी (दि. १०) रात्री रवाना झाले होते. याचा थेट परिणाम बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजावरही झाल्याचे दिसून आले. इतर दिवशी कार्यालयात या एजंटांचा वावर मोटार वाहन मालक व संस्थांचे प्रतिनिधी म्हणून मोठ्या प्रमाणात असतो. मात्र, बुधवारी या प्रतिनिधींचा वावर कमी झाल्याने दिवसभर कार्यालयात अभ्यागतांची अगदी तुरळक वर्दळ दिसत होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून परिवहन कार्यालयाबाहेर असणारी विविध दुकानेही बुधवारी दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. ( प्रतिनिधी )
मुंबईतील आंदोलनामुळे ‘आरटीओ’त शुकशुकाट
By admin | Published: February 12, 2015 12:01 AM