संजय पाटील -सरुड --शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर परिसरातील काही कष्टाळू माणसे सुमारे ८५ किलोमीटरचा प्रवास करून अनेक वर्षांपासून बैलगाडीतून मेसकाठी (चिवे) विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्यातील अपार कष्ट करण्याची ताकद यातून दिसून येते. त्यावरच ते आपल्या कुटुंबाचा गाडाही चालवत असून, हा व्यवसायच त्यांच्या कुटुंबाचा आधार बनला आहे.मलकापूर परिसरातून इस्लामपूर (जि. सांगली) या ठिकाणी महिन्याला ते चार खेपा मारतात. यासाठी त्यांना सरुड, शिराळा व इस्लामपूर असे तीन मुक्काम करावे लागतात. तिसऱ्या दिवशी ते मेसकाठी घेऊन इस्लामपूर बाजारपेठेत पोहोचतात. त्यांचा हा प्रवास बैलगाडीतून सुरू असतो. प्रत्येक बैलगाडीत सुमारे शंभरच्या आसपास मेसकाठ्या असतात. त्यांच्या या ताफ्यात पूर्वी २० ते ३० बैलगाड्या होत्या. मात्र, काळाच्या ओघात आता जेमतेम चार ते पाच गाड्याच प्रवास करताना किंवा मुक्कामाच्या ठिकाणी दिसतात.मलकापूर परिसरातील खासगी मालकीची मेसकाठीची बेटे खरेदी केली जातात. या मेसकाठी बेटांची ठरावीक मेसकाठी तोडमजुरांकडून तोड केली जाते. मेसकाठी तळातून तोडली, तर त्याची शिरी अन्य मेसकाठीत अडकलेली असतात. त्यातून बाहेर काढणे ही एक मोठी कला असून, ती फक्त ठरावीक लोकांनाच अवगत आहे. या मजुरांची मजुरीही जास्त असल्याचे सांगण्यात येते. इस्लामपुरात मेसकाठीच्या जाडी व लांबीवर तिचा दर ठरतो. संपूर्ण गाडीचे सुमारे तीन हजार रुपयांच्या आसपास पैसे होतात.यासाठी त्यांना सुमारे ८५ किलोमीटरचा प्रवास करताना तीन व येताना शिराळा व सरुड असे दोन मुक्काम करावे लागतात.
‘मेसकाठी’वर चालतोय त्यांच्या कुटुंबाचा गाडा
By admin | Published: May 21, 2015 11:34 PM