कोल्हापूर : कोल्हापुरात संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना अडवून महापालिकेतर्फे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये जे लोक जुजबी कारणांसाठी उगीचच बाहेर पडत आहेत, त्यांची चौकातच कोरोनाची रॅपिड ॲंटीजन चाचणी करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी त्यासाठी मिरजकर तिकटी परिसरात अशी रांग लागली होती.
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे, तरी कोल्हापूरच्या जनतेत कोरोनाविषयी भीती नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक आणि प्रशासन अशा दोन्ही स्तरावर प्रचंड हलगर्जी दिसून येत आहे. सोमवारी कोल्हापुरात संचार रस्त्यावर आणि बंदी कागदावर अशी स्थिती दिसून आली.कोल्हापूर शहरात रविवारी बऱ्यापैकी वर्दळ कमी होती. परंतु सोमवारी पुन्हा चित्र वेगळे दिसले. सर्वच रस्त्यावर वाहनांची वर्दळ, नागरिकांचा खुलेपणाने होणारा संचार, दुकानांच्या दारात झालेली गर्दी, रिक्षा वाहतूक सुरू, फेरीवाल्यांची रेलचेल, अत्यावश्यक सेवेतील गर्दीत हरविल्याचे जाणवत होते. रस्त्यावरील सिग्नल बंद असले तरी चार चाकी वाहनांची ये-जा सुरूच होती. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने अशा वाहनांचे पार्किग होते. अत्यावश्यक सेवेत न मोडणाऱ्या अस्थापना सुरू होत्या. नागरिकांचाही तिथे राबता होता.बिंदू चौक, दसरा चौक आणि रंकाळा टॉवर येथेच काय तो बंदोबस्त पाहायला मिळाला. पोलीस रस्त्यावर नाहीत आणि कोणी अडवत नाहीत हा संदेश घरोघरी पोहोचल्यामुळे शहरातील संचार अगदीच मुक्त झाला. पार्सलच्या नावावर काही रेस्टॉरंट, हॉटेल आतील बाजूने सुरू होती. चहाच्या गाड्या, वडाभजी विक्री करणाऱ्या हातगाड्या सुरू होत्या. तेथील गर्दीही नजरेत भरत होती.रविवारी कपिलतीर्थ व लक्ष्मीपुरी भाजी मंडईत काही विक्रेते, भाजी खरेदीला आलेले नागरिक कोरोना बाधित आढळले असतानाही नागरिकांनी भाजी खरेदीला गर्दी केली होती. मोठ्या संख्येने भाजी मंडईत कोरोनाबाधित आढळल्यानंतर तेथील नागरिकांची गर्दी आपोआप कमी होईल, असे वाटत होते. मात्र चित्र यापेक्षा वेगळे होते. भाजी न्यायला लोक मंडईत गेलेच होते.