कोल्हापूर : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात रताळे, खजूर, फळांची रेलचेल वाढली आहे. आवक चांगली असली तरी मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. दोन-तीन भाज्यांचा अपवाद वगळता इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. कडधान्यांच्या दरात थोडी वाढ झाली आहे.रविवारपासून नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांची रेलचेल बाजारात पाहावयास मिळत आहे. साधारणत: सफरचंद, मोसंबी, संत्री, केळी, चिक्कू या फळांना मागणी अधिक असते. त्यानुसार या फळांची आवक बाजारात अधिक असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी वाढ झाली आहे. सफरचंद किरकोळ बाजारात ६० पासून १०० रुपये किलोपर्यंत आहेत. पेरू ५० रुपये किलो, तर केळीचा दर ३० रुपये डझन आहे.
मोठ्या पेरूला चांगला दर असून तो साधारणत: १५० रुपये किलो आहे. रविवारी कोल्हापूर बाजार समितीत रताळ्यांची आवक २४५९ पोती झाली आहे. घाऊक बाजारात सरासरी ३० रुपये किलो दर असला तरी घाऊक बाजारात ४० ते ५० रुपये दर आहे. खजूरची आवकही चांगली आहे. प्रतवारीनुसार खजूरचा दर असून ६० पासून १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस असल्याने उपवासाच्या पदार्थांच्या खरेदीसाठी गर्दी दिसत होती.तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरांत काहीशी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो १००, तर हरभराडाळ ६५ रुपये दर आहे. शाबू ८० रुपयांवर स्थिर असून उर्वरित धान्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. परतीच्या पावसाने टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे आवक काहीशी कमी झाल्याने दर तेजीत आहेत.
किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो दर आहे. ऐन उन्हाळ्यात लालभडक टोमॅटो १० रुपये किलो होता; पण आता पावसामुळे डागाळलेला टोमॅटोला दुप्पट पैसे द्यावे लागत आहेत. गवार, पापडी वाल, फ्लॉवरच्या दरात वाढ झाली आहे. मेथी १५, तर शेपू १० रुपये पेंढी आहे. ओल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू असून ६० रुपये किलो दर आहे.
कांद्याचे दर घाऊक बाजारात प्रतिकिलो ४० रुपयांपर्यंत असून बटाट्याचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. किरकोळ बाजारात बटाट्याचा दर २० रुपये किलो राहिला आहे. दसºयाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची आवकही मोठ्या प्रमाणात आहे. दर १०० रुपये प्रतिकिलो आहे.सणासुदीच्या तोंडावर साखर तेजीतसाखरेला चांगला भाव मिळत असून, सध्या किरकोळ बाजारात ३८ ते ४० रुपये किलो दर आहे. दसरा आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखर तेजीत होण्याचे संकेत व्यापारी वर्गाकडून मिळत आहेत.