कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभावक्षेत्र असलेल्या हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील साखर कारखान्यांची धुराडी अद्याप थंडच आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील बहुतांश कारखान्यांच्या ऊसतोडण्या सुरू झाल्या आहेत.
परतीच्या पावसामुळे मुळातच उशीर झालेल्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यंदा दबकतच सुरू झाला. संताजी घोरपडे व डी. वाय. पाटील साखर कारखाने यंदा अगोदर सुरू झाले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवाअडवी सुरू केल्यानंतर एक-दोन दिवस गाळप अडखळले. त्यात ‘स्वाभिमानी’ची जयसिंगपूरची ऊस परिषद झाली. यामध्ये ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपये दराची मागणी झाली. साधारणत: एकरकमी एफआरपी आणि पैशांची उपलब्धता होईल, तसे त्यानंतरचे पैसे देण्याबाबत चर्चेतून तोडगा पुढे येऊ शकतो.
‘स्वाभिमानी’चे प्रभावक्षेत्र असलेल्या हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील साखर कारखाने अद्याप बंदच आहेत. ‘दत्त-शिरोळ’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, ‘शरद-नरंदे’, ‘पंचगंगा-इचलकरंजी’, ‘जवाहर-हुपरी’ या कारखान्यांनी अद्याप ऊसतोड दिलेली नाही. ‘वारणा’ कारखान्याने बॉयलर अग्निप्रदीपन केले आहे; पण मागील थकीत एफआरपीमुळे गाळप परवाना अडकला आहे.‘हमीदवाडा’, ‘संताजी घोरपडे’, ‘शाहू’, ‘बिद्री’, ‘कुंभी’, ‘डी. वाय. पाटील’, ‘दालमिया’ यांसह इतर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. हंगामाला अद्याप गती नसली तरी येत्या चार-पाच दिवसांत त्याला गती येईल.
- राजकीय घडामोडींमुळे बैठक स्थगित
‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेनंतर साखर कारखाने व संघटनेचे पदाधिकाऱ्यांची आज, सोमवारी बैठक होणार होती; पण राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे प्रमुख नेते मुंबईत अडकून पडले आहेत. त्यामुळे ही बैठक स्थगित झाली आहे.