गडहिंग्लज :
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संपलेला आहे, अशा आविर्भावात आपण सर्व जण वावरत आहोत. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची लक्षणे बदलली असून, संसर्गाची गती वाढली आहे. त्यामुळे लोकांनी जागरूक झाले पाहिजे. तसेच शहरे व गावातील प्रभाग आणि ग्रामसमित्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमध्ये आयोजित विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी विजया पांगारकर, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी असलेल्या नागरिकांनी लॉकडाऊनकाळात गावी न येता आहे त्या ठिकाणी सुरक्षित रहावे. आपल्यासह इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक १४ दिवसांचा कालावधी लॉकडाऊनमध्ये पूर्ण केला जात आहे.
दुसऱ्या लाटेची परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे मानधनावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची मागील देयके द्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र खोत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मल्लिकार्जुन अथणी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
-------------------
* ‘ऑक्सिजन’ची कमतरता भासणार नाही!
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट हा राज्यात आदर्श ठरला आहे. त्यातील ‘ऑक्सिजन’ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी लाइन टाकली जाईल. त्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
-------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील आढावा बैठकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. डावीकडून गटविकास अधिकारी शरद मगर, प्रांताधिकारी विजया पांगारकर, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे उपस्थित होते.
क्रमांक : १४०४२०२१-गड-०८