नगरसेविका - तेजस्विनी इंगवले
सध्याचे आरक्षण - सर्वसाधारण.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्थानिक हेवेदावे, दोन भावांत इरेला पेटलेले राजकारण, राजकीय नेत्यांनी केलेला प्रतिष्ठेचा प्रश्न यामुळे संघर्षाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या शिवाजी पेठेतील ‘प्रभाग क्रमांक- ४७ फिरंगाई’ येथे महापालिकेची निवडणूक कमालीची चुरशीची होणार आहे. गेल्या चार निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या रविकिरण इंगवले यांना त्यांचे बंधू अजय इंगवले यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे ‘फिरंगाई’चा आशीर्वाद कोणाला मिळणार, हा उत्कंठेचा विषय ठरला आहे.
शिवाजी पेठेत दिवंगत प्रा. विष्णुपंत इंगवले व पांडुरंग इंगवले यांचे मातब्बर घराणे म्हणून नावलौकिकप्राप्त आहे. इंगवले सर ‘शेकाप’चे ज्येष्ठ कार्यकर्ते. त्यांचा पेठेत आदरयुक्त दबदबा होता. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत रविकरण इंगवले यांनी राजकारणात प्रवेश केला; परंतु त्यांनी महापालिकेत ताराराणी आघाडीसोबत राजकारण केले. पुढे ते स्थायी सभापती, उपमहापौर झाले. सलग तीन निवडणुकीत ते विजयी झाले. गेल्या निवडणुकीत पत्नी तेजस्विनी इंगवले यांना निवडून आणले.
राजकारणात पुढे जाताच अनेक विरोधक तयार होतात. तसा अनुभव रविकरण यांनाही आला. दुर्दैवाने इंगवले कुुटुंबात फूट पडली आणि विरोधक घरातूनच तयार झाला. दोन भावांतील वाद मिटविण्याऐवजी त्यावर फोडण्या टाकण्याचे काम झाले. त्यामुळे तो मिटण्याच्या पलीकडे जाऊन टोकाला पोहोचला आहे. गत निवडणुकीत तेजस्विनी इंगवले व प्रज्ञा अजय इंगवले या जावांमधील लढतीतून तो दिसून आला. यावेळी हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
यंदा निवडणुकीत मोठी ईर्षा निर्माण झाली आहे. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी तेजस्विनींना शिवसेनेकडून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. अजय पांडुरंग इंगवले स्वत: काँग्रेसकडून लढणार आहेत. रविकिरण यांनी पाच वर्षांत मतदारसंघात चांगली विकासकामे केली आहेत. त्यांचा रोजचा संपर्क आहे. त्यांच्याकडे गेले की काम झाले असाच अनेकांचा समज आहे. मागच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजय इंगवले यांनीसुद्धा सामाजिक कामातून जनसंपर्क वाढविला आहे. त्यांना पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार मालोजीराजे यांचे पाठबळ आहे. पालकमंत्री पाटील यांनी त्यांना गांधी मैदान विकासासाठी नुकताच एक कोटींचा निधी दिला. त्यामागेही ही निवडणूकच आहे. त्यातून वॉकिंग ट्रॅक, पायऱ्या बांधल्या जाणार आहेत. दोन्ही बंधूंनी कोरोनाच्या काळात घराघरात जीवनावश्यक वस्तू, औषधी पोहोचविली आहेत. मतदारांच्या मदतीला धावून जाण्याची जागरूकता दोघांनी दाखविली आहे.
याच प्रभागातून भाजपकडून महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत यांनी, तर सरदार तालीम परिसरातून राजकुमार ऊर्फ राजू साळोखे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गायत्री यांनी भाजपच्या अनेक आंदोलनांतून सहभाग घेतला आहे, तर राजू साळोखे यांचे नेताजी तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य आहे. त्यांचा पेठेत चांगला संपर्क आहे.
- प्रभागातील विकास कामे -
- गांधी मैदान विकास योजनेअंतर्गत पाच कोटींची कामे.
- खासदार संजय मंडलिक यांच्या २५ लाखांच्या निधीतून व्यायामशाळा.
- स्वखर्चातून गणेश व हनुमान मंदिर बांधकाम.
- प्रभागातील अनेक गल्लींतून ड्रेनेज लाइनची कामे पूर्ण.
- प्रभागात अनेक ठिकाणी काँक्रीट पॅसेज, गटारीची कामे पूर्ण.
- अवचितपीर तालीम परिसरात दोन्ही बाजूने गटारींची कामे.
- फिरंगाई तालीम, काळकाईगल्ली, झुंजार क्लब येथे पेव्हर पद्धतीचे रस्ते पूर्ण.
- फिरंगाई मंदिर, विद्यार्थी कामगार, शाहू फ्रेंडस् सर्कल येथे हायमास्ट दिव्यांची सोय.
- फिरंगाई सांस्कृतिक हॉलचे बांधकाम.
- प्रभागातील शिल्लक कामे -
- सरदार चौक ते शिवाजी तरुण मंडळ रस्ता - १६ लाख
-कोमटेगल्लीत पाण्याची पाइपलाइन टाकणे- पाच लाख
- देशपांडे गल्लीत गटार व काँक्रीट पॅसेज रस्ते - १५ लाख
-महाराष्ट्र हायस्कूलसमोर गटर चॅनलचे काम - १० लाख
- आशीर्वाद बिल्डिंग ते कदम घरापर्यंत गटर, क्रॉसड्रेन करणे- ५ लाख
-
-कोट - गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या बजेटसह आमदार, खासदार, तसेच राज्य सरकार यांच्या माध्यमातून पाच कोटींची विकास कामे केली आहेत. काही कामांना कोरोनामुळे उशीर झाला. दुसऱ्या टप्प्यात आणखी ७५ लाखांची कामे सुरू होत आहेत.
तेजस्वीनी रविकिरण इंगवले, नगरसेविका
- गत निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते -
- तेजस्वीनी रविकिरण इंगवले (ताराराणी आघाडी) - २०७४
- प्रज्ञा अजय इंगवले ( अपक्ष) - १६९७
- भाग्यश्री उमेश जाधव (शिवसेना) - ८६
- अरुणा तानाजी पसारे (काँग्रेस) - १६
- अर्चना विजय साळोखे ( राष्ट्रवादी) - ३७८