कोल्हापूर : शहरात कोरोना कालावधीत कोविड केअर सेंटरमध्ये काम केलेल्या वॉर्डबॉय यांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहेत. पगार मिळावेत यासाठी संबंधितांनी शुक्रवारी महापालिकेत धाव घेतली. दरम्यान, आरोग्य विभागात फाईल अडकल्याने संबंधितांचा पगार झाला नसल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणी पाहणी घेऊन योग्य निर्णय घेऊ, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेच्यावतीने ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आली होती. आरोग्य कर्मचारी अपुरे पडू लागल्याने प्रशासनाने खासगी एजन्सीकडून वॉर्डबॉय ठोक मानधनावर घेतले होते. सुरुवातीला तीन महिने संबंधितांचा पगार देण्यात आला परंतु गेले तीन महिने पगार थकला आहे. ठेकेदाराने संबंधित वॉर्डबॉय यांना महापालिका प्रशासनानेच बिल भागविले नसल्याने पगार देऊ शकत नसल्याचे सांगितले.