कोल्हापूर : पाच लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ऊसतोड टोळीच्या मुकादमावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ संजय कृ ष्णात बोडके (वय ३५, रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) यांनी कुटुंबीयांसह अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पोलिस मुख्यालयासमोर झालेल्या या प्रकाराने पोलिसांची भंबेरी उडाली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संजय बोडके यांच्यासह अकराजणांवर गुन्हा दाखल केला. याबाबतची हकीकत अशी, संजय बोडके यांच्याकडून ऊसतोड मुकादम धोंडिराम हिराप्पा तुपसौंदर्य (रा. कोसारी, ता. जत, जि. सांगली) याच्यासह मुले सचिन, सागर, काका व सुनील यांनी पाच लाख रुपये घेतले होते. पैसे घेऊन ऊसतोड मजुरांची टोळी उपलब्ध केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे समजताच बोडके यांनी मुकामद तुपसौंदर्य यांच्या विरोधात सात दिवसांत गुन्हा दाखल करावा, अन्यथा शनिवारी (दि. १४) कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. बोडके यांच्या इशाऱ्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्निशामक दलासह पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. बोडके कुटुंबीय टाटा सुमोतून सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. गाडीतूनच त्यांनी फौजफाट्याची पाहणी केली. तेथून त्यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असल्याने पोलिस मुख्यालय परिसर रिकामा होता. संजय बोडके त्यांचा भाऊ सागर, आई सखुबाई, पत्नी सारिका, भावजय पूजा, मुलगा दिगंबर, बहीण सुनीता मोरे, भिकाबाई किल्लेदार, आदी कोणत्याही प्रकारे घोषणा न करता शांत उभे राहिले. संजय बोडके यांनी सर्वांच्या अंगावर कॅनमधील रॉकेल ओतले. हा प्रकार पोलिस मुख्यालयासमोर बंदोबस्तास उभ्या असलेल्या महिला पोलिसांनी पाहिला. त्यांनी स्वागत कक्षासमोर बसलेल्या पोलिसांना तत्काळ बोलावून घेतले. बोडके हे हातातील आगपेटीची काडी ओढत असतानाच पोलिसांनी ती काढून घेतली. यावेळी महिलांनी आरडाओरडा करून आगपेटी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि बोडके कटुंबीय यांच्यात धक्काबुक्की झाली. (प्रतिनिधी)
दऱ्याचे वडगावच्या कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Published: January 15, 2017 1:06 AM