कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता शहरातील ८१ पैकी ७० प्रभागांचे आरक्षण आज, गुरुवारी पुन्हा एकदा सोडत पद्धतीने निश्चित केले जाणार असून, पालिकेची संपूर्ण यंत्रणा पुरेशा ‘होमवर्क’सह सक्रिय झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांची धाकधुक नव्याने वाढली आहे. दरम्यान, ही सोडत सुरळीत पार पडावी म्हणून सोडतीच्या ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्ससह कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या शुक्रवारी (दि. ३१) महानगरपालिका प्रशासनाने निवडणुकीच्या निमित्ताने पारदर्शकपणे सोडत पद्धतीद्वारे आरक्षणे निश्चित केली होती; परंतु अधिकाऱ्यांनी चुकीची पद्धतअवलंबत नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गाचे आरक्षण काढल्याने निवडणूक आयोगाने त्याला हरकत घेऊन महापालिका प्रशासनाला फटकारले होते आणि निश्चित केलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गाचे अकरा प्रभाग सोडून २२ नागरिकांचा मागासवर्ग तसेच ४८ सर्वसाधारण प्रवर्गांचे आरक्षण पुन्हा निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने आज, गुरुवारी तशी तयारी केली आहे. शासकीय धान्य गोदामाजवळील बहुउद्देशीय हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी अतुल जाधव व आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत ही आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. एकदा हात पोळल्यानंतर आणि राज्यभर बदनामी झाल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी नव्याने आरक्षण सोडत काढण्याची तयारी अगदी काटेकोरपणे केली आहे. गेले दोन दिवस अधिकारी तिची रंगीत तालीम घेत होते. कडेकोट बंदोबस्त प्रभाग आरक्षण सोडतीवेळी गोंधळ, गडबड न होता ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. बुधवारी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी स्वत: सोडतीच्या ठिकाणी बंदोबस्ताचे नियोजन केले. आज, गुरुवारी स्ट्रायकिंग फोर्ससह पोलीस फौजफाटा नियुक्त केला आहे. आरक्षणे बदलणार शुक्रवारी निश्चित झालेल्या नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण व सर्वसाधारण-महिला अशा चार प्रवर्गांची आरक्षणे नव्या सोडतीमुळे बदलणार आहेत. त्यामुळे ज्या ७० प्रभागांची सोडत काढली जाणार आहे, तेथील इच्छुक उमेदवारांची पुन्हा एकदा घालमेल सुरू होती. ‘सर्वसाधारण’च्या नागरिकांचा ‘मागासवर्ग’ असा बदल होऊ शकतो. त्यामुळे या अस्वस्थतेत अधिकच भर पडली आहे. आज प्रत्यक्ष सोडतीवेळी त्याची तीव्र प्रतिक्रियाही उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणूनच कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सोडतीसाठी टप्पे... ८१ प्रभागांपैकी ११ प्रभाग ‘अनुसूचित जाती’साठी थेट आरक्षित उर्वरित ७० प्रभागांमधून २००५ व २०१० मधील ‘नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग’ आरक्षित प्रभाग वगळणे शिल्लक चिठ्ठ्यांमधून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला वगळून) प्रभाग निश्चित करणे शिल्लक चिठ्ठ्यांमधून २००५ व २०१० च्या निवडणुकांमधून महिला आरक्षित प्रभाग वगळणे. शिल्लक चिठ्ठ्यांमधून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) सोडत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग सोडतीकरिता प्रभाग शिल्लक नसल्यास २००५ मध्ये महिला आरक्षित प्रभागांचा विचार करणे. शेवटी उर्वरित सर्व चिठ्ठ्यांमधून ‘सर्वसाधारण महिला’ सोडत काढण्यापूर्वी २००५ व २०१० निवडणुकीतील ‘महिला आरक्षित प्रभाग’ वगळणे व ‘सर्वसाधारण महिलां’साठी चिठ्ठ्या काढणे. सोडतीकरिता प्रभाग शिल्लक न राहिल्यास २००५ मधील महिला आरक्षित प्रभागांचा विचार होईल. उर्वरित प्रभाग ‘सर्वसाधारण’ घोषित करणे.
प्रभागांची लॉटरी आज पुन्हा
By admin | Published: August 06, 2015 1:11 AM