कोल्हापूर : जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ‘कागल’ तालुक्यामध्ये चार वेळा खासदार, अनेक वेळा आमदार आणि मंत्री म्हणून काम केलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्या चिरंजिवांना म्हणजेच संजय मंडलिक यांना कोणतेही यश सहजसोप्या पद्धतीने मिळालेले नाही. त्यामुळेच गेली १० वर्षे संघर्ष केल्यानंतर त्यांना दिल्लीच्या संसदेत जाण्याची संधी जनतेने मिळवून दिली आहे.
एका ट्रॅक्टरचालकाचा मुलगा म्हणजेच सदाशिवराव मंडलिक हेआमदार, मंत्री, खासदार झाले. त्यामुळे संजय मंडलिक हे खासदारपुत्र झाले; परंतु वडिलांच्या दराऱ्यामुळे त्यांनी कधी तो तोरा दाखविला नाही. संजय यांची दहावीची परीक्षा झाली आणि त्यांच्या आई विजयमाला यांचे निधन झाले आणि ते मायेच्या छत्राला मुकले. वडील पूर्णवेळ राजकीय आणि सामाजिक कामात; परंतु हळूहळू संजय यांनी वडिलांच्या निवडणुकांमध्ये सक्रिय होण्यास सुरुवात केली. परंतु मोठ्या साहेबांनी पहिल्यांदा शिक्षण पूर्ण करण्याचा आग्रह धरला. एम. ए., बी.एड.चे शिक्षण झाल्यानंतर लगेचच संजय हे मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. प्रभारी प्राचार्य म्हणूनही तीन वेळा त्यांनी काम पाहिले.दिवंगत मंडलिक यांनी संजय यांना वयाची ३३ वर्षे पूर्ण होईपर्यंत फारशी कुठे संधीही दिली नव्हती. कारण आपल्यापाठोपाठ संजय यांनी लगेचच राजकारणात यावे अशी त्यांची भूमिका नव्हती. त्यामुळेच १९९७ साली बिद्री-बोरवडे मतदारसंघातून संजय मंडलिक पहिल्यांदा माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा पराभव करून जिल्हा परिषदेवर निवडून आले. २००२ साली चिमगाव मतदारसंघातून रणजित पाटील यांचा पराभव करीत केवळ १८ मतांनी विजयी झाले. त्यानंतर २०१२ सालीही त्यांनी चिखलीमधून बाजी मारली.
जिल्हा परिषदेत काम करताना बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती, पक्षप्रतोद म्हणून काम करताना त्यांना २१ मार्च २०१२ रोजी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली. सदाशिवराव मंडलिक यांच्या उतारवयामध्ये संजय मंडलिक यांनी त्यांच्या कागल तालुक्यातील संपूर्ण राजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. वडिलांच्या सान्निध्यात गेली अनेक वर्षे राहिल्यानंतर माणसे ओळखण्याचे कसब संजय यांच्याकडे आले आहे. बोलण्यातून कोणाला फारसे दुखावण्याचा त्यांचा स्वभाव नाही.
कार्यकर्त्यांमध्ये मिळून-मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. इतर कोणाच्या संस्थांच्या कारभारात फारसा हस्तक्षेप न करता आपली वाटचाल सुरू ठेवण्याचा त्यांचा स्वभाव आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी दूध संघाची स्थापना केली; परंतु त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत.
सदाशिवराव मंडलिक यांना सांभाळण्याचे काम त्यांच्या भोवतालच्या गोतावळ्याने अनेक वर्षे केले. मंडलिक हे समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे कमी वयात पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या संस्थासमूहातील कार्यकर्त्यांपासून ते शिक्षक, प्राध्यापकांपर्यंत आणि पुरोगामी कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकांनी मंडलिक यांना कायमच बळ देण्याची भूमिका घेतली.
सदाशिवराव मंडलिक यांचे निधन झाल्यानंतर या सर्वांनी हीच भूमिका संजय मंडलिक यांच्याबाबत घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कट्टर मंडलिकप्रेमी कार्यकर्ते ही संजय मंडलिक यांची पुण्याई आहे. त्यामुळेच त्यांच्यावर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप झाले तरी ते डगमगून गेले नाहीत. हजरजबाबीपणा हा संजय यांचा आणखी एक गुण आहे. त्यामुळेच आपल्या भाषणामध्ये ते पुढे चर्चा होत राहील असे मुद्दे मांडताना ते आपल्याला दिसले.गेल्या लोकसभेवेळी संजय मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी नेटाने पुन्हा काम सुरू केले. त्यांनी शिवसेना सोडावी यासाठीही प्रयत्न झाले; परंतु त्या मोहाला बळी न पडता त्यांनी ‘भगवा’च हातामध्ये ठेवला आणि त्याचे फळ त्यांना अखेर मिळाले. राज्यामध्ये उच्चांकी मते ज्यांना मिळाली त्यामध्ये मंडलिक यांचा समावेश आहे.
अतिमहत्त्वांकाक्षा ठेवत इतरांच्या संस्था काबीज करण्याचा प्रयत्न न करता सरळमार्गी वर्तणूक ठेवल्याने सर्वपक्षियांनी यावेळी संजय मंडलिक यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. हा माणूस आपल्याला विनाकारण त्रास देणार नाही, हाच त्यांच्याबद्दलचा विश्वास त्यांना मताधिक्य मिळवून देऊन गेला. एका संघर्षमयी व्यक्तिमत्त्वाचा वारसदार आज कोल्हापूरचा खासदार बनला.१९८६- शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळया पदाच्या माध्यमातून युवावस्थेमध्ये संजय मंडलिक यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला.१९८७/८९ - उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यू.आय.१९९५ ते २०००- शिवाजी विद्यापीठाच्या विधिसभेचे सदस्य१९९७ ते २००२- ‘गोकुळ’दूध संघाचे संचालक१९९७ ते २००२- जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा सदस्य१९९८/९९- बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापतिपद२००२ ते २००७- जिल्हा परिषदेवर दुसऱ्यांदा निवड२०१२ ते २०१७- जिल्हा परिषदेवर तिसºयांदा निवड२१ मार्च १२ ते १२ मार्च २०१४- जिल्हा परिषदेचे अध्यक्षअध्यक्ष- सदाशिवराव मंडलिक साखर कारखानाअध्यक्ष- सहकार बोर्ड, कोल्हापूरसंचालक- कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकमंडलिक कुटुंबीयएका उद्योगपतीची कन्या असलेल्या वैशाली यांनी संजय मंडलिक यांच्याशी विवाहानंतर मंडलिक परिवाराची जबाबदारी स्वीकारत या घराला घरपण आणले. आजही त्यांचे पाठबळ संजय यांच्यासाठी मोलाचे आहे. संजय यांचे मोठे चिरंजीव वीरेंद्र हे त्यांच्यासमवेत सध्या राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असून यशवर्धन आणि समरजित यांचे शिक्षण अजूनही सुरू आहे. यांतील एकजण विदेशामध्ये शिकतो आहे.