कोल्हापूर : क्षयरुग्णांची माहिती प्रत्येक महिन्याला जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांना मेलद्वारे न कळविल्यास संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा क्षयरोग विभागाने दिला आहे.
देशभरातील क्षयरोग २०२५ पर्यंत संपविण्याचा निर्धार आरोग्य विभागाने घेतला आहे. क्षयरोगाला गंभीर आणि धोकादायक यादीमध्ये घेण्यात आले असून, याबाबत १९ मार्च २०१८ रोजीच सर्व खासगी, वैद्यकीय व्यावसायिक, पॅथॉलॉजी लॅब, रेडिओलॉजिस्ट व औषध विक्रेते यांना त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद विहित नमुन्यात शासनाकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे दर महिन्याला याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या मेलवर पाठविणे सक्तीचे करण्यात आले आहे. अशी माहिती न पाठविल्यास इंडियन पिनल कोड ४५/१८६० अन्वये कलम २६९ आणि कलम २७० नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई होऊ शकते. निष्काळजीपणे जीवितास हानी पोहोचविणाऱ्या रोगाचा फैलाव हाेणे यासाठी सहा महिने कारावास, दंड व दोन्ही शिक्षा होऊ शकतात, तर कलम २७० नुसार घातक कृत्यामुळे जीवितास हानी पोहोचविणाऱ्या रोगाचा फैलाव करणे यासाठी एक वर्ष कारावास, दंड व दोन्ही शिक्षा होऊ शकतात.