- अनिल पाटील सरुड -गेल्या दिड महिन्यापासुन सरुड , शिंपे , वारणा कापशी , शिवारे ते भेडसगाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून येत असुन या गांवाच्या पश्चिमेकडील असलेली डोंगररांग व वारणा नदीकाठ परिसर बिबट्याच्या वास्तव्याचे स्थान बनल्याचे दिसून येत आहे . गेल्या दिड महिन्यापासुन बिबट्याचा या डोंगररांगेत व वारणा नदीच्याकाठी अधिवास असल्यामुळे या गावच्या परिसरातील शेतकरी वर्ग या बिबट्याच्या दहशतीच्या छायेखाली आहे . गेल्या महिनाभरात या बिबट्याने पाळीव प्राण्यांचा पाडलेला फडशा पाहता वन विभागाने त्वरीत या बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
गेल्या दिड महिन्यापूर्वी प्रथमता सरुड येथील पाळीव कुत्र्यावर या बिबट्याने हल्ला करत त्याचा फडशा पाडल्यानंतर या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले . त्यांनतर बिबट्याने डोंगर रांगेतुन आपला मोर्चा भेडसगाव , वारणा कापशी , शिवारे या गावाच्या हद्दीत वळवत तेथील शेळ्यांना आपले लक्ष्य करत वारणा नदीच्या या पट्यात आपली दहशत निर्माण केली आहे . भक्ष्य मिळू लागल्याने भेडसगाव ते सरुड , शिंपे दरम्यान असणारी डोंगर रांग व पुर्वेकडील वारणा नदीकाठ या दरम्यानच्या परिसरातच हा बिबट्या गेल्या दिड महिन्यापासुन ठाण मांडून आहे . कधी डोंगरावर तर कधी वारणानदी काठच्या शेत शिवारात या बिबट्याचा वावर आढळून येत आहे . त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी या बिबट्याचा चांगलाच धसका घेतला आहे. वारणा नदीकाठ परिसरात पाळीव प्राण्यांच्यावरील बिबट्याचे वाढते हल्ले पाहता या परिसरातील पाळीव प्राणी तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामुळे वन विभागाने या परिसरात सापळा लावुन या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा . - अमरसिंह पाटील, सरपंच, भेडसगाव
वनविभागाच्या नागपूर येथील कार्यालयाकडुन परवानगी मिळाल्याशिवाय बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सापळा लावता येत नाही . त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून एकट्याने शेतात जाऊ नये . शेतात जाताना मोबाईलवर गाणी लावावी जेणेकरुन आवाजामुळे बिबट्या दूर जाईल . सुरक्षिततेसाठी पाळीव प्राण्यांचा गोठा बंदिस्त ठेवावा .
- अमित भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मलकापूर
वारणा कापशी येथे बिबट्याचा पुन्हा शेळ्यांवर हल्ला शनिवारी रात्री वारणा कापशी येथील वाडीचे टेक परिसरात सर्जेराव खवरे यांच्या गोठ्यातील दोन शेळ्या व एक बोकड यांच्यावर बिबट्याने हल्ला करत त्यांना ठार केले आहे . गेल्या दहा दिवसातील वारणा कापशी येथील बिबट्याच्या हल्याची ही दूसरी घटना आहे .