लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील कुडचे मळा परिसरातील सारण गटारींच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे काही दिवसांपूर्वी दोन तरुणांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे येत्या काही दिवसांत भागातील सारण गटारींचा प्रश्न मार्गी न लावल्यास प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तेथील नागरिकांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सध्या शहरातील कुडचे मळ्यातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही दिवसांपूर्वी हर्षद तगारे व सौरभ गणपते या तरुणांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. भागात सारण गटारी, पिण्याचे पाणी यासह अन्य सुविधांचा अभाव आहे. वारंवार तक्रार दाखल करूनही कोणतीही कार्यवाही करत नाही. अजूनही भागात काही डेंग्यूचे रुग्ण आहेत. तरीही प्रशासन कानाडोळा करत आहे. सारण गटारींचा प्रश्न मार्गी न लावल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मोहन कुंभार, गणेश पिस्के, निवास नाईक, नितीन कांबळे, अनिल कदम, महंमद मुल्ला यांनी दिला आहे.