गारगोटी : सोनारवाडी (ता. भुदरगड) येथील दलित वस्तीकडे जाणारा रस्ता व गटर्स न झालेबद्दल तसेच देवस्थान जमिनीत झालेले अतिक्रमण त्वरित न काढल्यास ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा इशारा गावातील कार्यकर्त्यांनी दिला आहे. तसेच ही विकासकामे तत्काळ न झाल्यास तहसीलदार भुदरगड कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार भुदरगड यांना दिला आहे.
सोनारवाडी (ता. भुदरगड) येथील दलित वसाहतीकडे जाणारा रस्ता आणि गटर्स न झाल्याने वसाहतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या वसाहतीत राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तोंडी, लेखी मागणी करण्यात आलेली आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान जमिनीच्या गट नंबर ५ या काळाम्मा देवस्थान जमिनीमध्ये काही लोकांनी पक्की घरे बांधली आहेत. ही घरे ग्रामपंचायतीच्या घरठाण पत्रकी नोंद करण्यात आली आहेत. या गैरप्रकाराची चौकशी व्हावी, दलित वस्तीत जाणाऱ्या रस्त्यामध्ये अतिक्रमणे झाली असून रस्त्यातील अतिक्रमणे नकाशाप्रमाणे काढून दोन्ही बाजूची गटर्स होऊन मिळावीत.
वरील मागणीची पूर्तता न झाल्यास आम्ही सोमवार (दि४) ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. तसेच शासन स्तरावरून योग्य कार्यवाही न झाल्यास सोमवार, ११ ऑक्टोबर रोजी तहसीलदार कार्यालय गारगोटी येथे बेमुदत उपोषणास करणार असल्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर सुहास कांबळे, नामदेव कांबळे, जयवंत कांबळे, अजित कांबळे, सुनील कांबळे, महादेव कांबळे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
याबाबत ग्रामसेवक कुलदीप देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या वसाहतीकडे जाणारा रस्ता हा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनीतून जातो. याबाबत देवस्थान समितीशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी रस्ता करण्यास मज्जाव केल्याने रस्ता करण्यास अडचण येत आहेत. याबाबत आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले असून लवकरच या प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
फोटो २३ गारगोटी सोनारवाडी निवेदन
फोटो ओळ
रस्ता, गटर्स व्हावीत आणि देवस्थान जमिनीतील अतिक्रमणे काढावीत या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी सुहास कांबळे, नामदेव कांबळे, जयवंत कांबळे, अजित कांबळे, सुनील कांबळे, महादेव कांबळे आदी उपस्थित होते.