निवेदनात म्हटले आहे की, मल्लेवाडी गावच्या गावठाण हद्दीत अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण हटवण्याची मागणी सप्टेंबर २०१९ पासून करीत आहे. याबाबत लेखी निवेदन देऊन देखील त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने २६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु झालेले अतिक्रमण १५ दिवसांच्या आत पोलीस बंदोबस्तात काढून घेतले जाईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्याने आत्मदहन मागे घेतले. आश्वासन देऊन आठ महिने झाले तरी अतिक्रमण न हटवल्याने पुन्हा १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पाटील यांनी नमूद केले आहे.
निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, पोलीस ठाणे राधानगरी, ग्रामपंचायत व पोलीस पाटील मल्लेवाडी यांना दिल्या आहेत.