लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील घंटागाडीवरील कामगारांची देय रक्कम त्वरित अदा करावी. तसेच कचरा उठाव करणाऱ्या आराध्या एंटरप्रायझेस व आदर्श फॅसिलिटी सर्व्हिसेस यांनी केलेल्या वेतन भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी संतोष हत्तीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत इचलकरंजी नगरपालिका वॉर्ड क्र. १ ते २६ मधील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे. त्याची वाहतूक करून कचरा डेपोवर जमा करण्याचा ठेका आराध्या एंटरप्रायझेस, सातारा व आदर्श फॅसिलिटी सर्व्हिसेस, औरंगाबाद येथील कंपनीला दिला होता. मात्र, आराध्या एंटरप्रायझेस या कंपनीने निकीता एंटरप्रायझेस या नावाने बोगस फर्म काढून त्याद्वारे कामगारांना ३० ते ४५ टक्केच रक्कम कामगारांच्या खात्यात जमा केली आहे. तरी या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व कामगारांची देय रक्कम त्वरित अदा करावी. तसेच कामगारांची देय रक्कम मिळेपर्यंत संबंधित कंपन्याना बिले अदा न करण्याचा आदेश देण्यात यावा; अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.