कोल्हापूर : जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले वॉटर एटीएम आणि कचरा प्रक्रिया मशीनच्या अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली आहे. ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय समिती मंगळवारी मुंबईला रवाना झाली. आता अहवाल कधी येणार आणि त्यानंतर काय कारवाई होणार याची प्रतीक्षा लागली आहे.चौकशी अधिकारी जाधव यांनी चौकशी पूर्ण झाली आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणीही पूर्ण झाली आहे. आता अंतिम अहवाल तयार करून तो लवकरात लवकर ग्रामविकास मंत्र्यांकडे देणार असल्याचे सांगितले. शासकीय विश्रामगृहावर सलग दोन दिवस सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तयार झालेला अहवाल घेऊन ही समिती मंगळवारी मुंबईला रवाना झाली. मुंबईला निघण्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन त्यांच्या कानांवरही हा विषय घातला गेला.कोल्हापूरजिल्हा परिषदेत पाणी व स्वच्छता विभागाकडून भाजप सत्तेत असतानाच्या काळात बसवलेले वॉटर एटीएम व कचरा प्रक्रिया मशीनमध्ये घोटाळा झाल्याच्या, सरकारी पैशांचा अपव्यय झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर मंत्रालयातूनच चौकशी सुरू झाली.
ग्रामविकास मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश घेऊन ही समिती कोल्हापुरात दाखल झाली. चार दिवस मुख्यालयापासून ते थेट गावातील मशीन बसवलेल्या ठिकाणांपर्यंतची संपूर्ण माहिती घेतली गेली. अधिकाऱ्यांनी दिलेली कागदपत्रे आणि स्थानिक नागरिकांनी सांगितलेली माहिती यांचे एकत्रीकरण करून त्यांनी तिचे विश्लेषण केले.