आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा जीवनाचा वेद. प्रत्येक बाबतीत आजारीच पडू नये या गोष्टीचा सखोल विचार केला आहे. पाणी, जलपान याबाबतीत आयुर्वेदाचा विचार अतिशय सखोल असून चिंतनीय, मननीय आहे.जल, पेय, तोय, नीर, वारि, अंबु, उदक हे पाण्यास पर्यायी शब्द आहेत. मानवी जीवनास अत्यंत आवश्यक अशा गरजांपैकी पाण्याचे महत्त्व अन्नापेक्षाही जास्त आहे. हल्ली जलचिकित्सा (हायड्रोथेरपी) बाबत खूप लिहिले जात आहे. दररोज २ ते ४ लिटर किंबहुना त्याहीपेक्षा जास्त पाणी प्रत्येक व्यक्तीने २४ तासात पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यावेळी त्या व्यक्तीचे वय, वजन, ऋतुकाळ, आजार यांचा थोडाही विचार केलेला नसतो. शास्त्र सांगते की, पाण्याची शरीराला नितांत आवश्यकता असते. सबब शरीर जेव्हा पाणी मागेल तेव्हाच प्यावयास हवे. त्यासाठी प्रत्येकाने शरीराची भाषा ओळखण्यास शिकावयास हवे. ज्याप्रमाणे जेवणाची वेळ झाली म्हणून ठरावीक वेळी भूक नसली तरी जेवणे हे जसे आरोग्याला घातक तसेच शरीराची मागणी नसताना फक्त पाणी शरीराला उपयुक्त म्हणून पिणे हेदेखील त्रासदायक होय. त्यामुळे प्यालेले पाणी बाहेर काढण्यासाठी शरीराला प्रामुख्याने किडनीला जास्त काम करावे लागते. पाण्याचा शरीरातून निचरा होताना पाण्यासह कॅल्शिअम सोडियमसारखे शरीरोपयोगी क्षारदेखील बाहेर निघून जातात. ते केव्हाही त्रासदायकच आहे. जेवतानादेखील पाणी कसे, किती, केव्हा प्यावे याचेही काटेकोर नियम आहेत. पोटाचे चार काल्पनिक भाग केल्यास फक्त चौथा भागच पाण्याने भरावयाचा असून त्यांचेही नियम आहेत, असे शास्त्र सांगते.अजिर्णे भेजनवारि जिर्णेवारि बलप्रदम्!भोजनेच अमृतवारि भोजानांते विषप्रदम्!!म्हणजे अजीर्ण झाले असेल, भूक नसल्यामुळे किंवा पोट गच्च झाले असल्यास केवळ वेळ झाली म्हणून जेवण्यापेक्षा प्यालेले कोमट पाणी डॉक्टराच्या औषधासारखे काम करते. भोजन झाल्यानंतर ते पचल्यानंतर तेच पाणी बलदायक ठरते. जेवताना वारंवार खूप पाणी न पिता अधूनमधून घोट घोट प्याल्याने पाणी अमृताप्रमाणे उपयोगी ठरते आणि जेवल्यानंतर लगेच तांब्याभरुन पाणी पिणे हे विषाप्रमाणे त्रासदायक ठरते. याचे कारण असे की, जेवताना अन्नपचनासाठी पोटात पाचक रस, पाच काळगी पाणी प्याल्याने अग्नी थंड होतो. म्हणजेच तो सौम्य होतो व त्यामुळे अन्नपचन क्रियेस अडथळा येतो. असे सतत घडत गेल्यास न पचलेला अन्नरस सर्व शरीरभर प्रत्येक पेशीमध्ये साठून राहतो. त्या अन्नापासून ताकद, ऊर्जा न मिळता निरनिराळे आजार निर्माण होतात. या अर्थाने जेवणानंतर लगेच पाणी पिणे हे विषाप्रमाणे आहे. आपण घेतलेले अन्न जठरात दोन ते अडीच तास राहते, कारण ते पचन्यासाठी तितका वेळ लागतोच. जेवण पूर्णपणे पचल्यानंतर दोन तासात प्यालेल्या पाण्यामुळे पचलेला पक्व अन्नरस अमृताप्रमाणे उपयुक्त ठरतो. भाकरी प्यावी व पाणी चावून खावे असे शास्त्र सांगतो. पाणी पचवण्यासाठीदेखील पोटातील कप्पाग्नी हवा असतो. सबब पाणीच नव्हे, तर द्रव अन्नपदार्थ थोडा वेळ तोंडात धरून जिभेने फिरवल्यास त्यात लाळ मिसळून त्याचे पचन व्हावे. फ्रीजमधील थंड पाणी, बर्फ घालून उन्हाळ्यात प्यालेले पाणी, कोको-कोलासारखी निरनिराळे पेये यांचे सेवन शास्त्रात मान्य नाही. फार काय पाणीदेखील शक्यतो कोमट प्यावे. पाण्याचे पुढीलप्रमाणे अनेक फायदे आहेत : १) पाणी शरीरातील गर्मी दूर करते की, ज्यामुळे शरीरातील जलन (अॅसिडीटी) सूज आणि वेदना दूर करते. टाइफाईडसारखा ज्वरही जलचिकित्सेने लवकर आटोक्यात येतोे. २) शरीरांतर्गत विकारांना घुसळून त्याचे पाणी बनवून शरीराबाहेर फेकण्याचे कामही पाणी करते. भोजन जर पचले नाही तर त्याचा वायुप्रकोप होतो. पाण्याच्या स्पर्शानेही वायुप्रकोपाचे पाण्यात रूपांतर होते आणि पाण्यामुळे हा प्रकोप संडास व लघवीतून बाहेर फेकला जातो. ३) पाण्यामुळे नाडी संस्थानास (नर्व्हस सिस्टीम) शक्ती आणि आराम मिळतो. शरीरामध्ये नाडी संस्थान राजाचे काम करते. त्याच्या हुकमानेच भोजनाचे पचन, पोटाची सफाई, निद्रा येणे आदी शरीरामध्ये जरुरीच्या क्रिया घडत असतात. नाडीची कमजोरी म्हणजे शरीराची कमजोरी की, ज्यामुळे शरीर रोगांची शिकार बनते आणि शरीराची कमजोरी नाडीची कमजोरी बनवते. नाडी संस्थानास ठीक अवस्थेमध्ये राखण्यासाठी पाण्याचा प्रयोग फारच उपयुक्त आहे. (लेखक प्रसिद्ध होमिओपॅथिकतज्ज्ञ आहेत.)
जल आयुर्वेद दृष्टिकोन
By admin | Published: October 06, 2015 11:24 PM