ज्योतीप्रसाद सावंत --आजरा -अत्यंत निसर्गरम्य अशा चित्री प्रकल्पाच्या परिसराचे निसर्ग सौंदर्याबरोबरच पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण असलेले ठिकाण म्हणजे चित्री धरणातील सांडव्यावरून पडणारे पाणी होय. यंदा चित्री धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने सांडव्यावरून पाणीच वाहिलेले नाही. परिणामी जलाशयाच्या विरुद्ध बाजूस सांडव्याखाली अतिशय दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी साठल्याने पर्यटकांची निराशा होत आहे.यावर्षी चित्री प्रकल्प क्षेत्रात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने चित्री धरण ८५ टक्यापर्यंतच भरू शकले. पाण्याचे वेगाने होणारे बाष्पीभवन व धरणातून सोडावे लागणारे पाणी यामुळे प्रकल्प उभारणीपासून प्रथमच डिसेंबरअखेर साठ टक्क्याच्या खाली पाणीसाठा आला आहे. पाण्याने काठोकाठ भरलेला प्रकल्प व प्रकल्पातून जादाचा सांडव्यातून बाहेर पडलेला पाणीसाठा हे दृश्य दिसलेच नाही.चित्री प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने खाली येऊ लागला आहे. सांडव्याच्या खालील बाजूस पावसाचे साठलेले पाणीच अद्याप आहे. नेहमी स्वच्छ चकचकीत पाणी असणारा सांडवा एखाद्या धबधब्याप्रमाणे दिसत असतो. त्यामुळे पर्यटक या भागातील सौंदर्याचा आनंद लुटताना दिसत असे. सांडव्यावरून पाणी कोसळणे बंद झाल्याने या सांडव्याच्या पाण्यामुळे तयार झालेल्या पाण्याचे प्रवाहही पाण्याअभावी बंद होऊ लागले आहेत. चित्री धरणाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या या पाणी प्रवाहावर अवलंबून असणाऱ्या वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
‘चित्री’च्या सांडव्यातून पाणी वाहिलेच नाही...
By admin | Published: January 05, 2016 11:41 PM