संदीप आडनाईक -कोल्हापूर --पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ती जपून वापरा असा संदेश दुसऱ्यांना सांगणारे अनेकजण भेटतील, परंतु त्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करणारा विरळाच. कोल्हापुरातील शिक्षक मिलिंद यादव मात्र याला अपवाद आहेत. काही वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरातील पाण्याचे वाहते नळ बंद करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यांच्या या परिश्रमाला आता कुठे बळ मिळू लागले आहे. मिलिंद हे कोल्हापुरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीत अग्रेसर असलेले नाव. प्रिन्स शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कलाशिक्षक. कोल्हापुरातील अनेक चळवळींना त्यांनी जन्म दिला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पाणी वाचविण्याच्या या चळवळीची सुरुवात मोठी रंजक आहे. जुना बुधवार पेठेतून शाळेला जाता-येता या परिसरातील महिला आणि नागरिक घरासमोरील पाण्याचे नळ गरज नसताना सुरू ठेवतात. यामुळे कितीतरी पाणी वाया जाते, हे मिलिंद यांच्या लक्षात आले. सुरुवातीला अनेकांना त्यांनी समजावून सांगितले, परंतु नंतर मात्र त्यांनी स्वत:च ते नळ बंद करण्यास सुरुवात केली. गेली काही वर्षे सातत्याने ते न थकता हे काम करत आले आहेत. परिसरातील महिलाही आता त्यांना पाहताच आपोआपच नळ बंद करतात.शाळेतील एका पाण्याच्या नळातून गळणारे पाणी किती वाया जाते, याचे मिलिंद यांनी एकदा चित्रीकरण केले, तेव्हा एका मिनिटात २५0 मिलिलिटर पाणी वाया गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग एका तासात वाया गेलेल्या १५ लिटर पाण्याच्या हिशेबात महानगरपालिकेला वर्षाला ५६२९ रुपये इतके विनाकारण भरावे लागल्याचे लक्षात आल्यानंतर मिलिंद यांनी परिसरातील किती ठिकाणच्या नळाचे पाणी वाया जाते, याचा अभ्यास सुरू केला आणि त्याबाबत स्वत:च जनजागृती सुरू केली. शुक्रवारी त्यांनी स्वत:च्या शाळेत विद्यार्थी, माता, पालक यांना पाणी वाचविण्यासंदर्भात तसेच दुष्काळाची विशेषत: मराठवाड्यातील गंभीर स्थिती दाखविण्यासाठी स्लाईड शोचे आयोजन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. परिसरातील महिलांही आपलेच चुकतेय हे लक्षात घेऊन या जनजागृतीमध्ये स्वत:हून भाग घेऊ लागल्या आहेत. उभा मारुती चौक, मरगाई गल्ली, संध्यामठ गल्ली, महांकाली बचत गटाच्या महिलांनी गल्लोगल्ली फिरुन ‘पाणी जपून वापरा’ असा संदेश द्यायला सुरुवात केली. रोज सकाळी या महिला भागात फिरतात. तरुण मंडळांनीही ही चित्रफीत, स्लाईड शोचे आयोजन सुरू केले आहे. दिवसेंंदिवस यात अनेक मंडळे सहभागी होत आहेत. मिलिंद यादव यांच्यासारख्या एका व्यक्तीच्या या छोटाशा प्रयत्नामुळे भविष्यात ही मोठी चळवळ निर्माण होईल. जीवन बोडके यांच्यासारख्या अवघ्या सहा मित्रांच्या मदतीने मूर्तिदान, निर्माल्य दान या चळवळीला १९८५ मध्ये प्रारंभ केला होता. चिल्लर पार्टीसारख्या उपक्रमातून लहान मुलांमध्ये चित्रपट चळवळ जोपासण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पारंपरिक खेळ, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, दुर्मीळ बियांचे जतन, खतनिर्मिती असे विविध प्रयोग आणि चळवळ त्यांच्या प्रयत्नातून सुरू झाल्या आहेत. विज्ञान प्रबोधिनी, निसर्गमित्र यासारख्या संस्थांची पाणी वाचविण्याची मोहीमही दहा वर्षांपूर्वीच कोल्हापुरात सुरू झाली. आता त्याला थोडेसे बळ मिळू लागले आहे.चौदा मिनिटांचा स्लाईड शोमिलिंद यादव यांनी केवळ रंकाळा परिसरातील बंद न केलेल्या नळाच्या वाहत्या पाण्यामुळे पाण्याचा कसा अपव्यय होतो, याचे चित्रीकरणच केले आहे. चौदा मिनिटांचा हा स्लाईड शो परिसरात दाखविण्यात आला आहे. उभा मारुती चौकातील फडतरे गल्लीतील सरकारी आडावर अनेक महिला पाण्यासाठी येतात. येथेच शहरातील २५ हून अधिक गवळीही दूध घालून झाल्यानंतर रिकामे कॅन धुण्यासाठी येतात. २0 लिटरचे कमीतकमी ४ कॅन त्यांच्याकडे असतात. हे कॅन धुण्यासाठी त्यांना ५ लिटर पाणी पुरेसे असते. प्रत्यक्षात २५ लिटर पाणी ते रोज वापरतात. यामुळे रोज किमान ८0 लिटर पाण्याची नासाडी होते.
कोल्हापूरमध्ये रुजतेय पाणी वाचविण्याची चळवळ
By admin | Published: September 30, 2015 12:29 AM