एम. ए. शिंदे -- हलकर्णी परिसर हा गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील भाग. तालुक्याच्या पश्चिम भागातच गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमालीचे घटल्यामुळे पूर्व भाग तसा यंदा कोरडाच राहिला. परतीच्या पावसानेसुद्धा पाठ फिरल्यामुळे हलकर्णी परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जूनमध्ये पावसाने कधी नव्हे ती दमदार एंट्री केली होती. वेळेत पेरण्या पूर्ण होऊन पिकांची उगवणही चांगली झाली होती. त्यामुळे बळिराजा सुखावला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. शेतकऱ्यांनी जिवापाड कष्ट करून कशी पिके हाताला लागतील हेच पाहिले. आता भात पिकाची पोटरी गळ्यात अडकली आहे. कडक उन्हामुळे जमिनीला मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. आॅक्टोबर हिटला सुरुवात झाली सोयाबीन आणि भुईमूग ही या भागातील आर्थिक पिके आहेत, पण अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात पन्नास टक्क्यांहून अधिक घट झाली.हलकर्णी परिसरात तेरणी, नरेवाडी, येणेचवंडी हे तीन प्रकल्प आहेत. यापैकी येणेचवंडी हा लघु प्रकल्प जवळजवळ कोरडाच पडला आहे. येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच लघुप्रकल्पावर बसर्गे, नौकुड, येणेचवंडी येथील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. प्रकल्पात सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. हलकर्णीपासून जवळच इदरगुच्ची हे गाव आहे. या गावाला या नदीचा व लघु प्रकल्पाचा आधार आहे. तेरणी लघु प्रकल्पात साठवण क्षमतेच्या जवळपास पन्नास टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पातील पाण्यावर तेरणी आणि बुगडीकट्टी येथील नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. नरेवाडी लघु प्रकल्पावर बसर्गे आणि नरेवाडी नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे.विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोर्चे-आंदोलने केली. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनावर निवेदने स्वीकारण्यापलीकडे काहीच परिणाम झाला नाही. उपलब्ध पाण्याचा वापर भात, सोयाबीन, भुईमूग, मिरची या पिकांसाठीच शेतकऱ्यांनी केल्यामुळे यंदा ऊस पिकालासुद्धा अपुराच पाणीपुरवठा झाला आहे. नरेवाडी धरणात कायमस्वरूपी पाणीसाठा होण्यासाठी शासनाने नवीन स्रोत शोधावेत. पिण्याचे आणि शेतीचे पाणी प्रश्न गंभीर बनले आहेत. शासनाने ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना मदत द्यावी. हरळी कारखान्यापासून कालवा काढल्यास पूर्व भागातील २२ खेड्यांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. चित्री बंधाऱ्यात ८० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने उभ्या असलेल्या ऊस पिकाचा विचार करावा व उपसाबंदीचा आताच विचार करू नये. - जयकुमार मुन्नोळी, जि. प. सदस्य
हलकर्णी पूर्व भागात पाण्याचा प्रश्न गंभीर
By admin | Published: October 14, 2015 12:13 AM