कोल्हापूर : निम्म्याहून अधिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर योजनेतील शिंगणापूर ते पुईखडी मार्गावरील चंबुखडी पाण्याच्या टाकीनजीक मंगळवारी फुटलेल्या जलवाहिनीचे काम पूर्ण होते न होते तोच पुन्हा रात्री त्याच परिसरात जलवाहिनी फुटल्याने महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाची चांगलीच धावपळ उडाली. आता दुरुस्तीचे काम आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत चालणार असल्याने पुईखडी जलशुद्धिकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या भागांत आजही सलग दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी दुपारी चंबुखडी पाण्याच्या टाकीजवळ ११०० एम.एम. जाडीची जलवाहिनी अचानक फुटली होती. तिचे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले. हे काम रात्री पूर्ण झाले. त्यामुळे जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला. दुरुस्तीचे काम करणारे कर्मचारी, अधिकारीही घरी निघून गेले आणि तासाभरानंतर अचानक त्याच परिसरात पुन्हा जलवाहिनी फुटली. त्यामुळे रस्त्याकडेला असलेल्या घरांत पाणी शिरले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. त्यामुळे पाणी उपसा तातडीने बंद ठेवण्यात आला. पुन्हा सर्व कर्मचारी, अधिकारी तेथे पोहोचले. दुरुस्तीचे काम रात्रीच करणे अशक्य असल्याने बंद ठेवण्यात आले.बुधवारी सकाळी लवकर जेसीबीच्या साहाय्याने खुदाईचे काम हाती घेण्यात आले. काम थोडे कठीण असल्याने त्याला विलंब लागत आहे. जलवाहिनी जोडण्याचे काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. खुदाई झाल्यानंतर जलवाहिनी जोडण्यापूर्वी त्याखाली कॉँक्रीटचा बेस तयार करावा लागणार आहे. त्यामुळेच काम पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. या केंद्रावर अवलंबून असलेल्या साळोखेनगर, सुर्वे कॉलनी, देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगर, यशवंत पार्क तसेच संभाजीनगर परिसर, सुधाकर नगर, नाळे कॉलनी, मोरे कॉलनी, हनुमाननगर, रायगड कॉलनी, गजानन महाराज नगर, एनसीसी आॅफिस, जरगनगर ले आऊट १ ते ४, शेंडा पार्क, जवाहरनगर, सुधाकरनगर, राजेंद्रनगर, चिले कॉलनी, बागल चौक, शाहूपुरी, राजारामपुरी, दौलतनगर, सम्राटनगर, प्रतिभानगर, वाय. पी. पोवार नगर, पांजरपोळ, टाकाळा परिसर, विद्यापीठ परिसर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, आदी परिसरात मंगळवारी सायंकाळपासून पाणीपुरवठा झालेला नाही. १५ टँकर भाड्याने घेतलेपाणीपुरवठा सुरळीत होण्यास उद्या, शुक्रवारचा दिवस उजाडणार असल्याने टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महानगरपालिकेकडे आठ टँकर आहेत. त्यात आता १५ खासगी टँकर भाड्याने घेतले आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा झाला नाही, त्या भागात टँकरच्या ६० हून अधिक खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पुईखडी जलशुद्धिकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या काही भागांना गेल्या दोन दिवसांपासून कळंबा जलशुद्धिकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी कळंबा तलावातून पाणी घेण्यात येत आहे. सध्या कसबा बावडा, बालिंगा आणि कळंबा जलशुद्धिकरण केंद्रांतून पाणीपुरवठा नियमित सुरू आहे.
पुन्हा जलवाहिनी फुटली
By admin | Published: August 17, 2016 11:03 PM