कोल्हापूर : हिमालयाच्या लेह-लद्दाख प्रदेशातील २० हजार १९० फूटावर असणाऱ्या स्टोक कांगरी या पर्वतावरील व महाराष्ट्रातील भीमाशंकर,पदरगड, कोथळीगड, पन्हाळगड, रायगड या गडांवरील पाणी कोल्हापूर हायकर्स फौंडेशनतर्फे ५ जूनला रायगडावर आणण्यात येणार आहे. ६ जूनला या पाण्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यात जलाभिषेक करण्यात येईल, अशी माहिती संस्थापक सागर पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडावर खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने भव्य दिव्य प्रमाणात साजरा होत आहे. प्रत्येक वर्षी कोल्हापूर हायकर्सनेही या सोहळ्यात सहभाग नोंदविला आहे.
ट्रेकच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून पाणी आणून शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी जलाभिषेक केला जात आहे. यंदाही पहिल्या टप्प्यातील मोहिमेत मावळ्यांनी हिमालयाच्या लेह-लद्दाख प्रदेशातील २० हजार १९० फूटावर असणाºया स्टोक कांगरी या पर्वतावरील पाणी आणले आहे. तर दुसºया टप्प्यातील मोहिम ३१ मे रोजी सुरु होणार आहे.
महाराष्ट्रातील भीमाशंकर, पदरगड, कोथळीगड, पन्हाळगड, रायगड येथील पाणी घेऊन मावळे ५ जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ठिकाणी जाणार आहेत. या मोहिमेत सागर पाटील, शशांक तळप, राकेश सराटे, प्रणव बारटक्के, तेजन कुमठेकर, तन्मय हावळ, रवी धुमाळ, निरंजन रणदिवे, विजय ससे, मुकुंद हावळ, अतुल पाटील, संतोष घोरपडे हे गिर्यारोहक रवाना होणार आहेत.