राम मगदूम।गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ पैकी ३२ गावात यंदा पाणीटंचाई जाहीर झाली आहे. त्या यादीत नाव नसतानाही भविष्यात विदर्भ-मराठवाड्यासारखी वेळ आपल्या गावावर येऊ नये म्हणून शेकडो हात राबताहेत. केवळ सरकारी उपाययोजनेवर भरवसा न ठेवता बटकणंगलेकरांनी लोकसहभागातून ‘पाणी अडवा.. पाणी जिरवा..’ मोहीम खºया अर्थाने हाती घेतली आहे. आपापसातील सर्व मतभेद बाजूला ठेवून पाण्यासाठी, उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावकºयांनी एकीची मूठ बांधली आहे.
३५०० हजार लोकवस्तीच्या गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील बटकणंगले गावात प्रवेश करताच वेशीवरच उजव्या हाताला टोलेजंग इमारत दिसते. ५० वर्षांपूर्वी गावकºयांनी वर्गणी काढून बांधलेली ही इमारत माध्यमिक शाळेला नाममात्र भाड्याने दिलीय. यावरूनच गावाची वैचारिक बैठक लक्षात यावी. आदर्श ग्राम संकल्पनेसाठी अण्णा हजारे यांनी या गावाची निवड केली होती. सत्यशोधक विचारांच्या कृतीशील वारसा जपणारी माणसं अजूनही गावात सक्रीय आहेत. शिक्षण आणि श्रमाची उपासना मनापासून करणाºया गावातील ‘तरुणाई’ने ग्रामसुधारणेची पताका आता आपल्या खाद्यांवर घेतली आहे.त्याचे काय झाले, नोकरीनिमित्त शिरोळ तालुक्यात राहणारे एक तरुण प्राथमिक शिक्षक अभ्यास सहलीच्या निमित्ताने एप्रिलमध्ये ‘हिवरेबाजार’ला जाऊन आले.
सुट्टीत गावी आल्यानंतर आपल्या ‘आवाटा’ गल्लीतील तरुणांना त्यांनी ‘हिवरेबाजार’ची यशोगाथा सांगितली. त्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी हा उपक्रम आपल्या गावात राबविण्याचा निर्णय घेतला.प्रारंभी ‘पाणी प्रतिष्ठान’ बटकणंगले नावाने ‘व्हॉटस् अॅप’ ग्रुप तयार करण्यात आला. त्यात गावातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, तरुण मंडळे व सहकारी संस्था पदाधिकारी व मुंबईकर ग्रामस्थांचा समावेश करण्यात आला. त्यावरून ‘पाणी अडवा..पाणी जिरवा’ उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून सूचना मागविण्यात आल्या. अनेकांना हा उपक्रम आवडला. धडाधड सूचनांचा ओघ आणि ‘आम्हीदेखील तयार आहोत’, असा आश्वासक प्रतिसाद सुरू झाला.
१५ दिवसांपूर्वी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज केला. ६-७ एकरातील सरकारी गायरानात आणि गावच्या पूर्वेकडील ४२ एकरांतील भैरीच्या डोंगरात पाण्यासाठी दगडी बांध व चर खुदाईची परवानगी मागितली. त्याला ग्रामपंचायतीने तत्काळ संमती दिली अन् प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
दरम्यान, या मोहिमेसाठी विशेष गावसभा बोलावून ग्रामपंचायतीने संपूर्ण पाठबळही दिले. पहिल्या टप्प्यात गोठण नावाने ओळखल्या जाणाºया गायरानात २ फुट रूंदी, २ फूट खोल आणि १२ फूल लांबीच्या ५ चरी खोदण्यात आल्या. त्याच कालावधीत वळीवाचा मोठा पाऊस आल्याने पाण्याने भरलेल्या चरी पाहून तरुणांचा उत्साहात द्विगुणीत झाला व कामाची गती वाढली.
दुसºया टप्प्यात गावच्या पूर्वेकडील भैरीच्या डोंगरातदेखील २ फूट रूंद, ३ फूट खोल आणि १२ ते २० फूट लांबीच्या सुमारे ३०-३५ चरी खोदण्यात आल्या तर चार ठिकाणी दगडी बांध घालण्यात आले आहेत. १५ दिवसात सुमारे ३५००-४००० फूट लांबीची चर खोदण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात सुमारे ५० हजार लिटर पाणी साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
यानंतर गावातील ओढे-नाल्यांवर बंधारे घालण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पाणी अडविण्यासाठी चर खुदाईचे काम पावसाळ्यापर्यंत सुरुच राहणार आहे. पावसाळ्यात गावच्या डोंगराच्या परिसरात सीड बॉलस्च्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यात येणार आहे.बोलावणे नसतानाही..!दुसºया दिवशी कुठे जमायचे, काय काम करायचे. त्याचे नियोजन ‘व्हॉटस् अॅप’वरूनच कळविले जाते. ते वाचून सारी मंडळी एकत्र येत आहेत. कामाची आणखी आणि अंमलबजावणीकरिता तरुणांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. गावच्या पाणी चळवळीत श्रमदानासाठी काही मुंबईकरही येत्या शनिवार/रविवारी खास गाड्या करून गावी येणार आहेत.गुरुवारी शिवार फेरीजलयुक्त शिवार योजनेत गावाचा समावेश व्हावा अशी मागणी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी (२४) संबंधित सर्व खात्याचे अधिकारी व पदाधिकारी बटकणंगले गावाला भेट देणार आहेत.
चाकरमानी राबताहेतनोकरी आणि व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारी कांही चाकरमानी मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आली आहेत. तेही या उपक्रमात सहकुटुंब सक्रीय सहभागी झाले आहेत.मदतगारही आले धाऊन
गावासाठी राबणाºयांच्या श्रमपरिहारासाठी काही मंडळी चहा-नाष्टा आणि सरबत इत्यादी उत्स्फूर्तपणे देत आहेत. कुणी त्यांना टोप्या दिल्या आहेत, कुणी कुदळ, फावडी आणि बुट्या इत्यादी साहित्य पुरविले आहे. काहींनी शक्य तेवढी आर्थिक मदत दिली आहे.पाणी फौंडेशनची स्थापनाउत्कर्ष युवक मंडळ, चाणक्य मंडळ आणि युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याकरिता ‘पाणी प्रतिष्ठान बटकणंगले’ची स्थापना करण्यात आली आहे. दररोज सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते ७ अशा दोन सत्रात हे काम सुरू आहे.