कोल्हापूर : अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाच्या पोटातून चक्क पाण्याचे फवारे उडत असल्याचा व्हिडीओ कोल्हापुरात शुक्रवारी व्हायरल झाला. येथील पंचगंगा स्मशानभूमीतील हा व्हिडीओ असून महापालिकेकडे त्याबद्दल चौकशी केली असता तो खरा असल्याचे स्पष्ट झाले.
मृतदेह दहन होत असताना कारंज्याप्रमाणे पाच फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत असलेला हा व्हिडीओ आहे. सलग काही मिनिटे फवारे उडत असल्याचेही त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मृतदेह दहनावेळी पाण्याचे फवारे येणे काही चमत्कारिक नाही. अनेक मृतदेह दहनावेळी अशा प्रकारे पाणी बाहेर येते. वजन जास्त असणाऱ्या व्यक्ती, जास्त दिवस शवागृहात ठेवलेले मृतदेह, अथवा ज्यांना किडनीचे विकार आहेत अशा रुग्णांवर अंत्यसंस्कार करताना मृतदेहातून जादा दाबाने पाणी बाहेर पडत असल्याची माहिती महापालिकेतील वैद्यकीय विभागाने दिली.