जयसिंगपूर : कोयना धरण क्षेत्रात यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने धरणातील पाणीसाठ्याची पातळी कमी-जास्त प्रमाणात झाली आहे. शिल्लक पाणीसाठा वर्षभर पुरेसा ठेवण्यासाठी तलाठी कार्यालयात जलसंपदा कार्यालयाकडून जाहीर निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांनी तुटून गेलेल्या लागण उसाचा खोडवा न ठेवता कमी पाण्यावरील अन्नधान्ये, कडधान्ये घेण्याची विनंतीवजा सूचना केली आहे. तसेच उभ्या पिकासाठी आधुनिक सूक्ष्म जलसिंचनाचा वापर करावा, बारमाही पीक केल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास सांगली पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने तसेच धरणातील पाण्याची पातळी सुद्धा कमी होत गेली आहे. नद्यांचे पाणी प्रदूषित होत असल्यामुळे पाणीसाठा असूनही ते पिण्यासाठी वापरता येत नाही, अशी परिस्थिती आहे. कोयना धरणातील पाणी पातळीत घट निर्माण होत आहे. सध्या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी-जास्त होत असली तरी शिल्लक पाणी साठ्याचे नियोजन काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाने नदीकाठच्या शेतकऱ्यासह जलसिंचन योजना संस्थेला पाणी टंचाईबाबत जाहीर प्रकटनाद्वारे सूचना दिल्या आहेत. आगामी काळात ऊस पिकाबरोबर अन्य पिकांना वेळेत पाणी मिळणार नाही. यामध्ये सध्या तुटून गेलेल्या उसाच्या लागणीचा खोडवा ऊस न ठेवता तीन महिन्यांची कडधान्ये करण्याची विनंती शेतकऱ्यांना केली आहे. यावर्षी पाण्याची कमतरता भासणार असून त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पीक कमी करून अन्नधान्य व कडधान्ये करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. उभ्या पिकासाठी आधुनिक सूक्ष्म जलसिंचनाच्या सोयी करून पिकांना पाणी द्यावे, अन्यथा पाणी कपात झाल्यास उभे पीक धोक्यात येण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. यामुळे तालुक्यातील कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या साखर पट्ट्यात असणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची हजारो हेक्टर क्षेत्र असणारी शेती संकटात सापडण्याची शक्यता आहे. या पुढील काळातही शासनाने शेती पिकाबरोबर, उद्योग व्यवसाय तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत काटकसर व बचतीबाबत जागृती करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
जलसंपदा विभागाकडून पाणी कपातीचे धोरण
By admin | Published: November 10, 2015 11:14 PM