कोल्हापूर : गुरुवारी संध्याकाळी सात पासनं घरात पाणी यायला सुरू झाल्यावर पटापटा सगळं सामान बांधून वरच्या माळावर ठेवेपर्यंत गुडघ्यावर पाणी आलं. अंगावरच्या कपड्यांनी बाहेर पडलो, रात्रभर पावण्यांकडं थांबलो, सकाळी तिथं बी पाणी, आणि आमची घरं तर दिसायचीच बंद झाली, काल, शुक्रवारी बोटीतनं हितं आलो, आधीच गरिबी त्यात आता काय काय राह्यलं नाही, कोरोनानं जीव वाचला हेच लई झालं म्हणायचं... पुरामुळे कोल्हापुरातील कल्याणी हॉलमध्ये स्थलांतरित झालेले चिखली, आंबेवाडीचे लोक आपबिती सांगत होते.
या हॉलमध्ये सध्या चिखली आंबेवाडीचे ८४ कुटुंब आणि जवळपास अडीचशे लोक आहेत. दरवर्षी या गावांना पुराचा फटका बसतो, यंदा २०१९ पेक्षासुद्धा जास्त पाणी आलं, असं त्यांचं म्हणणं आहे. गुरुवारी संध्याकाळपासून पुराचे पाणी गावात शिरायला सुरुवात झाली. २०१९ चा अंदाज धरुन बऱ्याच जणांनी वरच्या मजल्यावर सामान हलवलं, यावेळी ते पण पाण्यात गेलं. ज्यांची बैठी, कौलारु घरं आहेत ती आणि पूर्णत: बुडाली आहेत. घरातलं सगळं सामान डोळ्यादेखत वाहून जात होतं. थोडावेळ शाळेत आसरा घेतला, पाहुण्यांच्या घरी थांबले तरी पूर कमी होईना, त्यात आजारी आणि वयोवृद्ध माणसांचे हाल झाले; पण आपत्ती व्यवस्थापनचे जवान, एनडीआरएफचे जवान, बोटी आल्या आणि सगळ्यांच्या स्थलांतराला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून ते कल्याणी हॉल आणि शेजारच्या शाळेत निवाऱ्याला आहेत...पुराचं पाणी ओसरायची वाट बघताना आपल्या घरात काय झालं असेल, या चिंतेने त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं आहे.
----
मी सेंट्रिंग काम करतो, कोरोनानं ते पण तीन महिने बंदच होतं. आता कुठं सुरू झालं म्हणेपर्यंत पूर आला. सगळं सामान, धान्य वाहून गेलं. हे असंच होत राहिलं तर आमच्यासारख्या हातावरचं पोट असणाऱ्यांनी जगायचं कसं, गेल्यावर घराची अवस्था न बघण्यासारखी झालेली असते.
प्रकाश कांबळे
--
घरात ७५ वर्षांची आजी, रात्री अडीचला पाणी आलं, तोपर्यंत पसाराच आवरत हाेतो. अंगावरच्या कपड्यांनी बाहेर पडलो. माझी दोन्ही मूलं अजून आंबेवाडीतच आहेत, त्यांचा फोन लागेना, सगळं घर पाण्याखाली गेलंय, काय झालं असेल तिथं काय माहीत.
शोभा कांबळे
--
९० वर्षांचा आजारी माणूस. त्यांना दोन-तीन चादरीत गुंडाळलं आणि बोटीत चढवलं. वरनं पाऊस पडत होता. वाचवणाऱ्यांनी हातात एक पिशवी तेवढी घ्यायला दिली. यंदा २०१९ पेक्षा पण जास्त पाणी आलंय, घरात काय काय राह्यलं नाही आता.
हिराबाई दळवी
--
२४
कल्याणी हॉल
--