इचलकरंजी : मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. २४ तासात ८ फूट पाणी वाढून धोका पातळी ओलांडून ७८ फुटावर पोहोचली आहे. पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत २ हजार ६३८ कुटुंबातील १० हजार ६६९ नागरिकांचे विविध १५ निवारा छावण्यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तर 291 पेक्षाही अधिक जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागरिकांत पुराची धास्तीही निर्माण झाली आहे.
अनपेक्षित पणे पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात तसेच पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे. काल शुक्रवारी रात्री पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे अनेक कुटुंबांची त्रेधातिरपिट उडाली. रात्रीपासूनच नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीची धडपड सुरू केली. दुचाकी, चारचाकी, टेम्पो, बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांतून साहित्य हलविण्याचे काम सुरू झाले. इचलकरंजी-टाकवडे, इचलकरंजी-हुपरी हे मार्ग बंद झाले आहेत.
रात्री अनेक सखल भागात तसेच ओढ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. शांतीनगरकडून नारायण मळ्याकडे जाणाऱ्या आणि निरामय हॉस्पिटलजवळील ओढ्याचे कठडे वाहुन गेले. तसेच रात्रीतून पाणी पातळी ६ फुटाने वाढल्याने थेट नागरी वस्तीत पाणी शिरले. तर बोहरा मार्केट समेारील ओढ्यालगतचा रस्ता खचून कठडा फुटल्याने ओढ्यातील पाणी थेट मार्केटमध्ये शिरल्याने अनेक दुकानगाळे जलमय झाले. आतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नगराध्यक्षा अलका स्वामी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून पूरग्रस्तांच्या स्थलांतर सुरू केलं आहे. आवाडे सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्याने तेथील मशिनरी हलवण्याचे काम सुरू असल्याने या सबस्टेशनवरून वीजपुरवठा होत असलेला भाग रात्रभर अंधारातच होता.
वेदभवन, घोरपडे नाट्यगृह, महासत्ता चौक आणि लिंबू चौक ठिकाणी जनावरांसाठी छावण्या उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी ५०० जनावरांची सोय करण्यात आली आहे.
महापुराचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल-डिझेल देण्याचा निर्णय घेतला असला तरी शुक्रवारी रात्रीपासून शहरात पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. सन २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्यावेळी पाणी पातळी ८१ फुटांपर्यंत पोहचली होती. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणी पातळीत वाढच होत असल्याने त्या महापुराच्या आठवणींनी नागरिक धास्तावल्याचे दिसत आहे.