लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. शहरासह धरण व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पूर ओसरू लागला आहे. सोमवारी (दि.२६) दुपारी चार वाजता पाणी पातळी ७८ फुटांवर, तर मंगळवारी चार वाजता ७७ फुटांवर होती. २४ तासांत पाणीपातळी एक फुटाने कमी झाली आहे. सध्या पाणीपातळी ७६.५ फुटांपर्यंत खाली आली आहे.
शहर व परिसरात मंगळवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. पाणी ओसरत असल्याने अनेक भाग रिकामे होत असून, याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
गावभागात ओढ्याचे पाणी येत असल्याने या परिसरात अधिकच काळजी घेण्याची गरज आहे. नगरपालिकेमार्फत जनजागृती व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी कमी झालेल्या भागातील रस्त्यावरील व तुंबलेल्या गटारीतील घाण काढण्याचे काम सुरू आहे. अद्यापही काही भागांत पाणी असल्याने नागरिकांनी पालिकेच्या छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे.
चौकट
आपत्ती व्यवस्थापनाने वृद्धेला दिले जीवदान
लक्ष्मी दड्ड परिसरातील शेळके मळ्यात रमाई देसाई ही ६० वर्षीय वृद्धा तीन दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकली होती. याची माहिती मिळताच पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने सकाळी आठच्या सुमारास त्या वृद्धेला पाण्यातून यांत्रिक बोटीद्वारे बाहेर काढले. त्यानंतर वृद्धेला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, प्रकृती चांगली आहे.
अनेक घरांची पडझड
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेक दिवस घरे पाण्याखाली होती, तसेच जोरदार पावसानेदेखील घरांच्या भिंती जीर्ण झाल्याने त्यांची पडझड झाली आहे. २०१९ व २०२१ या सलगच्या पुरामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुरामुळे अंगारकी चतुर्थी नाहीच
महापुराने गावभागासह, मळेभाग, नदीवेस भागाला वेढा दिला आहे. नदी तीरावरील वरदविनायक मंदिरासह अन्य गणपती मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. याठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात अंगारकी चतुर्थी साजरी केली जाते. मात्र, सध्याचे कोरोना व महापुराचे दुहेरी संकट यामुळे मंगळवारी अंगारकी चतुर्थी साजरी केली नाही.
फोटो ओळी
२७०७२०२१-आयसीएच-०१ महापुरामुळे गावभाग आंबी गल्लीतील घराची भिंत पडली.
२७०७२०२१-आयसीएच-०२
महापुरात अडकलेल्या वृद्धेला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.