जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे दररोज पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. अवघ्या पंधरा दिवसांत पाणीपातळी ३४ फुटांवर गेली. ३९ फुटाला इशारा पातळी आहे. त्यामुळे पंचगंगेची पातळी लवकरच इशारा फुटापर्यंत पोहोचेल असे संकेत होते. मात्र अचानक पावसाने उघडीप दिली. सध्या राजाराम बंधाराच्या सर्व लोखंडी पेल्टा काढल्या असल्यामुळे बंधाऱ्याच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे.
दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र आता तब्बल दोन आठवडे झाले पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकरी आता पुन्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान कसबा बावडा परिसरात भात व ऊस पिकात साचून राहिलेले पाणी आता कमी झाले आहे. भात पिकाला मात्र आता पुन्हा पावसाची गरज आहे. बळीराजाचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत.
फोटो : ०१ राजाराम बंधारा
गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने राजाराम बंधारा येथे पाणी पातळीत घट झाली आहे. सध्या बंधाऱ्याजवळ १४ फूट इतकी पाण्याची उंची आहे.
( फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )