कोल्हापूर : येत्या आठवड्याभरामध्ये जिल्ह्यातील गावागावांत जलसाक्षरतेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
जागतिक जलदिनाच्या औचित्याने सोमवारी जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जल शपथ घेतली. यावेळी चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
चव्हाण म्हणाले, छतावरील पाणी साठवण पद्धती, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धती आणि निर्माण होणारे सांडपाण्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन या माध्यमातून आपण पाणी बचतीचे छोटे प्रयत्न करून योगदान द्यावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या जागतिक जल सप्ताहामध्ये सहभागी व्हावे.
या आठवड्यामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जल शपथ घेतली जाणार आहे. २७ मार्चपर्यंत जलसाक्षरता वाढविण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन तालुका व ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आले आहे. यामध्ये स्रोत व पाणी साठवण टाकी स्वच्छता व साफसफाई अशी कामे केली जाणार आहेत. यासोबतच ग्राम पंचायतींच्या क्षेत्रात शून्य गळती मोहीम, जलजीवन मिशन लोगो डिझाईन स्पर्धा, पाणी वाचवा मोहीम व पाण्याचे महत्त्व विशद करणारी रांगोळी स्पर्धा, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचे आयोजन ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे.
यावेळी अजयकुमार माने, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, मनीषा देसाई, प्रियदर्शिनी चं. मोरे, अरुण जाधव, संजय राजमाने, मनीष पवार यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
२२०३२०२१ कोल संजयसिंह चव्हाण