कोल्हापूर : शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर लादलेली पाणीपट्टी दरवाढ रद्द करून जुन्या दरानेच आकारणी करावी तसेच सांडपाणी अधिभार रद्द करावा, अशी मागणी गुरुवारी हॉटेल मालक संघाच्या वतीने महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.
हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने, सचिव सिध्दार्थ लाटकर, अरुण भोसले यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने प्रशासक बलकवडे यांनी भेट घेतली. तसेच त्यांना मागणीचे सविस्तर निवेदन सादर केले.
महानगरपालिका प्रशासनाने दि. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी व्यावसायिक वापरातील ग्राहकांसाठी पाणीपट्टीत पंधरा टक्के वाढ केली. त्या वेळी लॉकडाऊन नव्हता. शिवाय भविष्यात लॉकडाऊन लागेल अशी कल्पनाही कोणाला आली नाही. परंतु मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग जोर धरू लागला तसे कडक निर्बंध लागायला सुरुवात झाली. गेल्या अडीच महिन्यापासून तर कडक निर्बंधामुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. भविष्यात कधी सुरू होईल हेही सांगता येत नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आणखी किती नुकसान सोसावे लागणार आहे याचा अंदाज नाही. हा सगळा विचार करता महानगरपालिका प्रशासनाने केलेली पाणीपट्टी त्वरित रद्द करून जुन्या दराप्रमाणेच आकारणी करावी तसेच सांडपाणी अधिभार देखील रद्द करावा, असे हॉटेल मालक संघाने म्हटले आहे.