कोल्हापूर : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, येत्या महिन्या-दीड महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात ९१ गावांमध्ये पाणीटंचाई भासू शकते. ही टंचाई भासू नये यासाठी विविध उपायोजना सुरू करण्यात आल्या असून, विंधन विहिरींसाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे.
जिल्ह्यांमध्ये गावांबरोबरच वाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ९१ गावांबरोबरच २१९ वाड्यांवरही पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून एका गावातील आणि चार वाड्यांवरील सार्वजनिक विहिरी खोल करण्यात येणार असून, तेथील गाळ काढण्यात येणार आहे. टंचाई भासण्यास सुरुवात होताच तातडीचा उपाय म्हणून गावातीलच खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. गावांमधील ४५, तर वाड्यांवरील १८ खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत.
विंधन विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिवर्षी नियोजन करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात ४५ गावांमध्ये आणि १९२ वाड्यांवर विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन असून, त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. वाड्यांवरील २ नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे, तर ३ वाड्यांवरील पूरक पाणी योजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
चौकट
दोन कोटींचा खर्च
सार्वजनिक विहिरी खोल करणे, गाळ काढणे, खाजगी विहिरी अधिग्रहित करणे, नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करणे, पूरक पाणी योजना करणे या सर्व कामांसाठी २ कोटी ४ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. सध्या केवळ पूर्वतयारी सुरू आहे.
कोट
संभाव्य कोणत्या गावांमध्ये आणि वाड्यांवर पाणीटंचाई भासेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येणार आहे. पाणीटंचाई याचा अर्थ त्या गावात पाणीच नाही असा होत नाही. शासकीय योजनेच्या स्रोताद्वारे पाणीपुरवठा बंद होतो; परंतु त्या ठिकाणी अन्य पर्यायांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू ठेवला जातो. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. ८ मार्चअखेर अशी टंचाई कुठेही नाही.
मनीष पवार
प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर.