अमर पाटीलकळंबा : यंदा प्रथमच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कळंबा तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. तलाव पात्रातील ऐतिहासिक शाहू कालीन विहीर उडली पडायला सुरुवात झाली आहे. या शाहू कालीन विहिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कळंबा तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी तलावानजीकची बालिंगा व कळंबा गावे तलाव पात्रापासून दूर वसवली. शिवाय संपूर्ण तलाव कोरडा पडला तरी ग्रामस्थांचे आणि मूक जनावरांचे पाण्याविना हाल होऊ नये म्हणून तलाव पात्रात भव्य विहीरीची उभारणी केली होती. आजमितीला कळंबा तलावात निव्वळ आठ फूट पाणीसाठा शिल्लक असून जलचरांच्या अस्तित्वासाठी हा पाणीसाठा पावसाळ्याच्या सुरवातीपर्यंत ठेवणे प्रशासनास क्रमप्राप्तच आहे. पावसाळ्यास अद्यापही अडीच महिन्याचा कालावधी आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगात होत असून डेड वॉटर शिल्लक राहिले तरी पाणीउपसा बंद करण्यात आला नसल्याने २०१६ नंतर पुन्हा यंदा तलाव कोरडा ठणठणीत पडणार हे निश्चित. त्यामुळे कळंबा ग्रामपंचायतीपुढे जैवविविधता कायम राखत पाणीप्रश्नाची भीषणता कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. प्रशासनाने तलावाचा जीव घोटला गेल्या साठ वर्षात यशवंतग्राम निर्मलग्राम पुरस्कार विजेत्या कळंबा ग्रामपंचायतीला ग्रामस्थांसाठी स्वतःची पाणीपुरवठा योजना उभारता आली नाही. शिवाय पालिका मालिकीच्या तलावाचे पाणी ग्रामपंचायतिला हवे पण सत्तर लाखांची पाणीपट्टी भरण्याच्या प्रश्नी हात वर. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बिल्डर लॉबीने धुमाकूळ घातला असून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे सुरू झाले आहे. तर पालिका मालकीच्या तलावावर एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नसल्याने तलावाची गटारगंगा होत आहे.
Kolhapur: कळंबा तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठला, ऐतिहासिक शाहूकालीन विहीर उघडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 6:19 PM