भादोले : भादोले गावास वारणा नदीतून होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद असून, महिला वर्गाला पाण्यासाठी विहिरी, कूपनलिकांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे भादोले गावची अवस्था म्हणजे, ‘नदी उशाला कोरड घशाला’ अशी झाली आहे.भादोले (ता. हातकणंगले) येथील पाणीपुरवठा ऐन पावसाळ्यात गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. पाण्यासाठी महिलांना विहिरी, कूपनलिकांच्या आधार घ्यावा लागत असून महिला, लहान मुले व पुरुषांची पाण्यासाठी फरफट सुरू आहे. पावसाळ्यात शेतातील कामे सुरू असताना पाण्याच्या मागे महिला व पुरुषांना लागावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास विचारले असता, वारणा नदीची पाणीपातळी वाढली आहे, तर पाणीपुरवठ्यासाठी उभारलेला जॅकवेल मागील वर्षी कोसळला आहे. जॅकवेलच्या नव्याने उभारणीसाठी शासनाकडे निधीची मागणी करूनही अद्याप निधी मिळालेला नसल्याने स्टार्टर नदीचे पाणीपातळी वाढल्यानंतर बुडतात. नदीवरील पाणीपुरवठ्यासाठीचे स्टार्टर बंद असल्याने पाणीपुरवठ्याकरिता ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहे.मात्र, सध्यातरी ग्रामपंचायतीने गावात टॅँकरने तरी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. तर शासनाने गावचा पाणी प्रश्न गांभीर्याने घेऊन जॅकवेलच्या उभारणीसाठी तत्काळ निधी देण्याची गरज आहे. (वार्ताहर )
भादोलेचा वारणेतून पाणीपुरवठा बंद
By admin | Published: July 25, 2014 11:55 PM