कागल : येथील ऐतिहासिक जयसिंगराव तलावाची पाणीपातळी सहा फुटांवर आली आहे. तलावाचा मोठा भाग उघडा पडला आहे. गेली काही वर्षे या तलावाच्या पाण्याचे संवर्धन आणि साठवणूक करण्याची वेळ नगरपालिकेवर आली असून, कागलकरांसाठी दूधगंगा नदीचे पाणी हाच एकमेव आधार बनत चालला आहे.
साधारणपणे बावीस फुटांवर पाणीसाठा झाला की, तलाव पूर्णक्षमतेने भरतो, तर त्याच्यावर पाणी साठले की तलाव भरून वाहू लागतो. शहराकडील बाजूने असणारे सांडवे सुटतात. हे पाणी नागोबा ओढ्यातून दूधगंगा नदीला जाते, अशी ही रचना आहे. पण, आता विविध कारणांनी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरतच नाही. कारण तलावात येणारे पाणलोट बुुजलेले आहेत. या क्षेत्राचे वेळीच संवंर्धन झालेले नाही. तलावाशेजारून काळम्मावाडीचा कालवा गेला आहे. कालव्यात काळम्मावाडी धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने येण्यास सुरुवात होईल तेव्हा या पाण्याने हा तलावही भरेल, असा विचार करून हा कालवा तलावाला जोडला आहे. ही संकल्पना चांगली आहे; पण आता कालव्यात पाणी नसल्याने तलावाचे पाणी गळतीने कालव्यात जाते. त्यामुळे पाणी संपत आहे.
याशिवाय तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हा देखील नगरपालिकेने दुर्लक्षित केलेला विषय आहे. या पार्श्वभूमीवर कागल शहराला लागणारे पिण्याचे पाणी दूधगंगा नदीतून उचलले जात आहे. कागल शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता पालिकेने तीन टप्प्यांत पाणीपरवठा योजना राबवून पाणीपुरवठा यंत्रणा मजबूत केली आहे; पण जयसिंगराव तलावात नैसर्गिक पाणीसाठा कायम राहण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आज काळम्मावाडी धरणात चोवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दूधगंगा नदीतून खूप मोठ्या प्रमाणात पाणी उचलले जात आहे. त्यामुळे कागलकरांना टंचाईची झळ फारशी बसत नाही; पण भविष्याच्या दृष्टीने जयसिंगराव तलावाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सध्या दर सोमवारी नगरपालिकेकडून नदीतील पाणी या तलावात सोडले जात आहे. एकूणच कागलकरांची तहान सध्या दूधगंगेच्या पाण्यावर भागत आहे.पाण्याचा गैरवापर.. पालिकेचे दुर्लक्ष?कागलमध्ये अनेकांनी नळांना तोट्याच बसविलेल्या नाहीत. काही अपार्टमेंटच्या बांधकामांनाही पाणी मारण्यासाठी पालिकेचे पाणी उन्हाळ्यातही वापरले जात आहे. विद्युतमोटारीने पाणी उपसा केला जातो. हे प्रकार पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेलाही माहीत आहेत; पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. चाव्यांना मीटर बसविली आहेत; पण ते नावालाच आहेत. मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारणी झाल्यानंतर चोरून पाणी वापरण्याचे प्रकार बंद होतील. दरम्यान, पाणीपुरवठा सभापती सौरभ पाटील यांनी कर्मचाऱ्यांना नळधारकांच्या चाव्या तपासण्याच्या सूचना केल्या आहेत. यात गैरप्रकार सापडल्यास चावी कनेक्शन बंद केले जातील, असे सांगितले आहे.वीस मिनिटेच पाणी...कागल नगरपालिकेने पाणीपुरवठा कमी केला आहे. रोज चाळीस मिनिटांऐवजी वीस मिनिटेच पाणी सोडले जाते. दर सोमवारी ‘ड्राय डे’ पाळला जात आहे. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन नगराध्यक्षा माणिक माळी यांनी केले आहे. तर काहीजणांनी नदीत पुरेसे पाणी असताना कपात कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. काहीजण पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून दोन दिवस ड्राय डे करावा, अशीही मागणी करीत आहेत.