खेड : नातूनगर धरण प्रशासनाने दुबार शेतीखेरीज कालव्यांना पाणी सोडणे बंद केल्याने खेड नगरपालिकेला खोपी धरणातून पाणी मागवावे लागले. शहरवासीयांकडून दररोज ३० लाख लीटर पाण्याची मागणी आहे. ती पूर्ण करण्यासाठी खोपी धरण प्रशासनाने खेड शहरासाठी हा पाणीपुरवठा सुरू केला आहे. खोपी धरणाचे पाणी दररोज सोडण्यात येणार असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. धरणात पाण्याचा साठा मुबलक असल्याने जून महिन्यापर्यंत खोपी धरणातील पाणी शहराला मिळणार असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. खोपी येथील डुबी नदीवर धरण बांधण्यात आले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. मात्र, कालव्यांचे काम समाधानकारक न झाल्याने दुबार शेतीसाठी या पाण्याचा काहीही उपयोग होत नसल्याने प्रशासनस्तरावरून या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे दुबार शेती करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. धरणात पाणी असूनही शासनाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा वापर करणे शक्य होत नाही. अशातच खेड शहरासाठी या धरणातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याअगोदर प्रतिवर्षी खेड शहरासाठी नातूवाडी धरणातून पाणीपुवठा करण्यात येत असे. गतवर्षी १० एप्रिलपासून हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. नगरपालिकेने केलेल्या विनंतीनुसार खोपी धरण प्रशासनाने पाणीपुवठा सुरू केला होता. यावर्षी मात्र नातूवाडी धरणातून होणारा पाणीपुरवठा ३१ मार्चपासूनच बंद करण्यात आल्याने नगरपालिकेने खोपी धरणातून पाणी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या धरणातून दररोज ३० लाख लीटर्स पाणी उचलण्यात येत आहे. यामुळे शहरवासीयांना पुरेसे पाणी उपलब्ध होत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या भरणे जॅकवेलमधील पाण्याची पातळी खालावल्याने खबरदारीच उपाय म्हणून नगर परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रतिवर्षी १५ डिसेंबर ते १५ एप्रिल असे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात येते. यावर्षीही असे वेळापत्रक तयार करण्यात आल्याने त्यानुसारच पाणी सोडण्यात येत आहे. असे असले तरीही पाऊस सुरू झाला की, हे पाणी बंद करण्यात येणार आहे. भरणे जॅकवेलमधून पाणीपुरवठा करण्याची मुदत संपल्याने खोपी - पिंपळवाडी धरणातून आता पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. खोपी येथील डुबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातून १ एप्रिलपासून हे सोडण्यास सुरुवात झाली आहे. खेड शहराची तहान भागवण्यासाठी हे धरण पूर्णपणे सक्षम असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)
नातूवाडीचा पाणीपुरवठा बंद : ३० लाख लीटर पाण्याचा उपसा
By admin | Published: April 12, 2016 1:05 AM