उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या कळंब तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आजघडीला तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या बिलांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीसाठी पाच सरस्यांची समिती गठित केली आहे. त्यामुळे या चौकशीतून काय समोर येते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मागील तीन-चार वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. गतवर्षी तर सरासरीच्या अवघा ४८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्प आणि इतर जलस्त्रोत कोरडेठाक आहे. त्यामुळे एकेका गावाला दहा ते २० किमी अंतरावररून टँकरद्वारे पाणी आणून पुरवठा करावा लागत आहे. कळंब तालुक्यातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. आजघडील तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, याच टँकरला वितरित करण्यात आलेली बिले आता चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. संदीपान कांबळे यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. खेपा कमी होत असतानाही त्यांना अधिकची बिले दिली जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार सीईओ रायते यांनी २९ फेब्रुवारी रोजी सुनावणीही घेतली. सुनावणीदरम्यान झालेल्या चर्चेअंती त्यांनी आजवर वितरित करण्यात आलेल्या बिलांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील चौकशी समितीचे प्रमुख म्हणून पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, वित्त विभागाचे मुख्य लेखा अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक आणि संदीपान कांबळे यांचा समावेश आहे. दरम्यान, सीईओंकडून आदेश प्राप्त होताच चौकशीच्या अनुषंगाने कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. पंचायत समिती स्तरावरून टँकरला दिलेल्या बिलाच्या अनुषंगाने सर्व रेकॉर्ड मागविण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशीतून नेमके काय समोर येते? हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
कळंब तालुक्यात ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा
By admin | Published: March 11, 2016 1:03 AM