कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचे ऐनपावसाळ्यात पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. कळंबा, कसबा बावडा व शिवाजी विद्यापीठ, अशा तीन ठिकाणांहून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला, तर काही कार्यकर्त्यांनी थेट टँकरचाच ताबा घेतल्यामुळे पाणीपुरवठ्याचे तोकडे प्रयत्नही निष्फळ ठरले. त्यामुळे रविवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात टँकरचे प्रभागनिहाय वाटप सुरू केले.
पाणीपुरवठा बंद असल्यामुळे काही माजी नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या टँकरचाच ताबा घेऊन आपापल्या भागात पाणीवाटप सुरू केले. कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांना आपल्याच भागात येण्याची सक्ती केली. त्यामुळे काही मोजक्याच माजी नगरसेवकांना टँकर मिळत होते. सर्वसामान्य नागरिकांना मात्र पाणी मिळणे दुरापास्त झाले होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पोलीस बंदोबस्तात समान पाणी वाटप करण्याच्या सक्त सूचना दिल्या.
प्रशासक बलकवडे यांनी रविवारी दुपारपर्यंत कळंबा फिल्टर हाउस येथे ठिय्या मारला. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त विनायक औंधकर, उपरचनाकार नारायण भोसले, जलअभियंता अजित साळोखे यांच्याबरोबर बैठक घेऊन पाणी वाटपावर सूक्ष्म नियोजन करण्यावर भर दिला. फिल्टर हाउस परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणाही कार्यकर्त्याला आत सोडले जात नव्हते. केवळ टँकरच आत घेऊन त्यांना पाणी दिले जात होते.
टँकरचा क्रमांक, चालकाचे नाव, कोणत्या भागात पाणी दिले जात आहे, याच्या नोंदी करून घेतल्या जात होत्या. खासगी टँकरनासुद्धा पाणी भरून दिले जात होते. महापालिकेचे २९ टँकर सध्या शहरात पाणी वितरण करत आहेत, तर सोलापूर, सांगली व सातारा येथून भाड्याने घेतलेले ३० टँकर महामार्गावर पाणी आल्याने शिरोली येथे अडकले आहेत. आज, सोमवारपर्यंत सर्व टँकर पाणी वितरणाच्या कामास सहभागी होतील, असे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले.
भावी नगरसेवकांचा पुढाकार
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, माजी तसेच भावी नगरसेवक पाणीटंचाई ही संधी मानून मतदारांसमोर पाण्याचे टँकर घेऊन जात आहेत. अनेक प्रभागांत माजी, तसेच भावी नगरसेवकांनी चार ते पाच हजार रुपये भाड्याने टँकर घेऊन आपली बॅनर्स त्यावर लावली आहेत. काही का असेना; पण त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा भार काहीसा हलका होत आहे.