कोल्हापूर : शहरात पिण्याचे पाणी भरपूर आहे; मात्र केवळ आपल्यातील विस्कळीतपणामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे; त्यामुळे नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात योग्य समन्वय ठेवून योग्य व पुरेशा पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाईल, असे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी झालेल्या स्थायी समिती सभेत सांगितले. नगरसेवकांनीसुद्धा त्यांच्या भागात काही अडचणी असतील, तर त्या लेखी स्वरूपात द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.शहरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नियोजनाचा अभाव, गळती, यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी सभापती शारंगधर देशमुख व संदीप कवाळे यांनी सभेत केली. त्यावेळी आयुक्तांनी त्याची दखल घेत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.शहरातील जलवाहिन्यांची गळती काढण्याचे काम सुरूआहे. त्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कामाच्या वेळेचे नियोजन करताना अधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे.
अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर हे पाणी पुरवठा विभागाकडे, तसेच पाणी पुरवठा सुरळीत सुरूराहण्यासाठी लक्ष देतील. त्यांनी वेळोवेळी फिरती करावी. जेथे माझी आवश्यकता असेल, त्या ठिकाणी मी स्वत: येऊन पाहणी करतो. सदस्यांनी व प्रशासनाने एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असे सांगितले.अमृत योजनेच्या कामांचा आढावा मी आठवड्यात घेणार आहे. ही कामे गतीने पूर्ण व्हावीत, अशी आपली अपेक्षा आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.शिंगणापूर येथे पाणी उपसा करण्याकरिता पाचवा पंप खरेदीची प्रक्रिया सुरू करणार आहे. पाचव्या पंपाद्वारे तासाला सात लाख लिटर्स पाण्याचा डिस्चार्ज वाढेल; त्यामुळे ई वॉर्डला पाणी पुरवठा करता येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.झुम प्रकल्पामधील कचऱ्यावर प्रक्रिया करून कॅपिंग करण्यात येणार आहे; परंतु तेथे जमिनीखालून लिचड वाहत असून, ते बंद करावे; त्यामुळे परिसरातील विहिरी व बोअरला दुर्गंधीयुक्तपाणी येत आहे, असे माधुरी लाड यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर खुलासा करताना मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले की, सध्या जो कचऱ्याचा ढिग आहे, त्यावर प्रक्रिया करून कॅपिंग करण्यात येणार आहे. हे काम १५ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यामधील कोणतीही लिचड वाहणार नाही.बऱ्याच वर्षांनी आयुक्त स्थायी सभेतमहापालिकेच्या स्थायी समिती सभेत अत्यंत महत्त्वाचे आर्थिक निर्णय होत असतात. धोरणे ठरत असतात. कोट्यवधींची कामे मंजूर केली जातात; परंतु या सभेला आयुक्त म्हणून सहा-सात वर्षांत कोणी उपस्थित राहिले नाहीत. स्थायी सभेस उपस्थित राहावे, असे कोणतेच बंधन आयुक्तांवर नाही; त्यामुळे आतापर्यंत आलेल्या आयुक्तांनी दांड्या मारल्या; परंतु डॉ. कलशेट्टी यांनी सभेस उपस्थित राहून, आपण महिन्यातून एक-दोन सभांना येईन, अशी ग्वाही दिली.