कोल्हापूर : गेल्या आठ दिवसापासून बंद असलेला शिंगणापूर उपसा केंद्राकडील उपसा रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे. या केंद्रात शिरलेले महापुराचे पाणी ओसरल्यामुळे तेथील चार मोटारी बाहेर काढण्यात पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. त्याच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले.पंचगंगा नदीला महापूर आल्यामुळे गेल्या शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाची तिन्ही उपसा केंद्रे महापुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती.
शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू व्हावा यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, अधिकारी गेल्या पाच दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. बालिंगा उपसा व जलशुध्दीकरण केंद्र सुरू करण्यात त्यांना यश मिळाले. नागदेववाडी जल उपसा केंद्रही शुक्रवारी रात्री सुरू झाले.शुक्रवारी दुपारी शिंगणापूर उपसा केंद्रातील पुराचे पाणी ओसरल्याने चार मोटारी बाहेर काढण्यात आल्या. उर्वरित तीन मोटारी खोलण्याचेही काम रात्रीपर्यंत सुरू होते. चार मोटारी फिटिंगसह दुरुस्ती करण्यास शनिवार व रविवार असे दोन दिवस लागणार आहेत. रविवारी सायंकाळी त्या जोडल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष पाणी उपसा सुरू होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे पाण्याची प्रतीक्षा संपण्याचा वेळ आली आहे.शहरातील पाण्याचा पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय सुरु आहे. विशेषत: ई वॉर्डातील नागरिकांचे तर प्रचंड हाल होत आहेत. टँकरची प्रतीक्षा करण्यातच नागरिकांचा दिवस जात आहे. अनेक ठिकाणी अजूनही टँकरवर पाणी घेण्यास गर्दी होत आहे. कूपनलिकांवर गर्दी होत आहे.शहराच्या अनेक भागात टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. शुक्रवारी महापालिकेच्या टँकरच्या १५३ फेऱ्या तर खासगी टँकरच्या १४७ फेऱ्यातून ३० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला. टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे एक सूत्र घालून दिले आहे. प्रत्येक प्रभागात दिवसभरात दोन ते तीन टँकर पाणी मिळते. त्यामुळे पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता आली.