कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील जिल्हा परिषद कॉलनी येथील अनेक घरात पिण्याच्या पाण्याची बेकायदेशीर कनेक्शन घेण्यात आल्याची माहिती कळताच महापालिका शहर पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी मोहिम राबवून २५ हून अधिक घरातील बेकायदेशीर कनेक्शन तोडण्याची कारवाई केली. या कारवाईत पाणी चोर सापडले असले तरी पाणी चोरांना मदत करणाऱ्या महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचेही बिंग फुटले. फुलेवाडी रिंगरोडला लागून असलेली जिल्हा परिषद कॉलनी महापालिकेच्या हद्दीत नसून नागदेववाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. तेथे काही ठेकेदारांनी कॉलनी वसविली आहे. कॉलनी वसविताना, घरे बांधून देताना घर मालकांना महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या जलवाहिनीवरुन तीन ते चार इंची जलवाहिनी टाकून घरांना कनेक्शन दिली आहेत. महापालिका हद्दीत कॉलनी येत नसल्याने त्यांना कनेक्शन देण्याचा प्रश्नच येत नाही. परंतू पालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेला हाताशी धरुन अनेक बेकायदेशीर कनेक्शन दिली गेली आहेत.
या बाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी सर्व कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले.अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने मंगळवारी जिल्हा परिषद कॉलनीत जाऊन अनेक घरातील नळ कनेक्शनची तपासणी केली. तेंव्हा सर्व कनेक्शन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. सुमारे २५ घरातील कनेक्शन बेकायदेशीर आढळून आल्यानंतर ती तोडण्याची कारवाई करण्यात आली. दिवसभर ही कारवाई सुरु होती.