लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण होण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या असून, यापुढे नवीन कोणत्याही नैसर्गिक अडचणी आल्या नाहीत तर दिवाळीपर्यंत जनतेला पाणी देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी महानगरपालिकेत शहराशी निगडित असलेल्या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी बैठकीतील चर्चेची माहिती दिली. बैठकीस प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
थेट पाईपलाईन योजनेतील सर्व अडथळे दूर झाले असून केवळ सोळांकूर येथील १८०० मीटर व जॅकवेलजवळील वन खात्याच्या जमिनीतील ५०० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे. फेब्रुवारीअखेर धरणातील पाणीपातळी कमी करून मार्च महिन्यात जॅकवेलच्या कामास सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जॅकवेल तसेच इंटेकवेलचे काम मार्च व एप्रिल महिन्यांत पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे. तीस किलोमीटर अंतरात वीजवाहक तारा टाकण्याच्या कामापैकी १० किलोमीटरचा परवाना मिळाला असून चार किलोमीटरच्या तारा व पोलचे काम पूर्ण झाले आहे. बाकीचे कामही लवकरच सुरू होईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
‘अमृत’ची कामे मार्चला पूर्ण -
शहरातील अमृत योजनेतील सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनास दिल्या. २११ किलोमीटरच्या जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाण्याच्या १२ टाक्या बांधण्यात येणार असून त्यांपैकी आठ टाक्यांची कामे सुरू आहेत. चार टाक्यांची कामे ही एमजेपीच्या हद्दीत असून त्यांची परवानगी घेण्याची जबाबदारी प्रशासक बलकवडे यांनी घेतली असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
पॉईंटर -
- पुईखडी जलशुद्धिकरण केंद्रात वॉटरप्रुफिंगचे काम सुरू
- थेट पाईपलाईनचे डिझाईन बदलणार नाही
- सोळांकूर ग्रामस्थांशी मंगळवारी प्रशासक चर्चा करणार
- सर्व कामे गतीने सुरू करण्याच्या सूचना.