चिखली येथील ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा असणारा पाणीप्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळला होता; मात्र अवघ्या पाच महिन्यांतच नवनिर्वाचित सदस्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा ध्यास घेत स्वप्नवत असणाऱ्या पाणी योजनेची पूर्तता केली. ही बाब कौतुकास्पद आहे. यापुढेही राजकारण विरहीत गावाला सर्वांगसुंदर बनविण्यासाठी सज्ज राहुया, असे आवाहन बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले यांनी केले.
दरम्यान, या योजनेच्या पूर्ततेमुळे ग्रामस्थांना आता दररोज मुबलक, स्वच्छ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नानीबाई चिखली (ता.कागल)येथील ग्रामपंचायतीमार्फत नव्याने राबविलेल्या पाणी योजनेच्या पाणी पूजन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच छाया चव्हाण होत्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले, अरुण भोसले, संजय गांधी योजनेचे सदस्य सदाशिव तुकान प्रमुख उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून १८ लाख साठ हजार रुपये खर्चून ही पाणी योजना राबविली. या योजनेमुळे जुन्या योजनेवरील भार हलका होणार आहे.
अल्लाबक्ष सय्यद यांनी स्वागत केले. प्रास्ताविक रवींद्र कस्तुरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचा राजश्री शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवानी भोसले यांचा सत्कार झाला. यावेळी उपसरपंच मनिषा पाटील, सुरेश पाटील, महम्मद मुल्लाणी, ग्रामविकास अधिकारी जालिंदर बुवा, संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. बशीर नदाफ यांनी सूत्रसंचालन केले. श्रीशैल नुल्ले यांनी आभार मानले.
चौकट - जाहीरनाम्यातील वचनपूर्ती....
फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत नानीबाई महाविकास आघाडीने गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे वचन दिले होते. त्यानुसार त्यांनी सत्तेवर येताच अवघ्या पाच महिन्यातच गावची स्वप्नवत असणारी पाणी योजना करून वचनपूर्ती केली. याबाबत ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
कॅप्शन-नानीबाई चिखली येथील नवीन पाणी योजनेचे पाणी पूजन करताना बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले, सरपंच छाया चव्हाण, सदाशिव तुकान आदी.