इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात जलपर्णीच्या बिजांचा हिरवा तवंग दिसू लागला असून, पात्रातील पाणी दूषित झाल्याचे द्योतक आहे. फेब्रुवारी महिन्यात नेहमी दिसणारी जलपर्णीची बिजे जानेवारीमध्येच दिसू लागल्याने शहरास आतापासूनच पाणीटंचाई भासण्याची चिन्हे आहेत.इचलकरंजीस पंचगंगा व कृष्णा अशा दोन्ही नद्यांतून पाणीपुरवठा केला जातो. दोन्ही नद्यांतून पाणी उपसा केला, तर दोन दिवसांतून एकवेळ पाणी दिले जाते. उन्हाळ्यात पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाले की, फक्त कृष्णा नदीचे पाणी उचलले जाते. तेव्हा तीन दिवसांतून पाणी शहरास मिळते. कृष्णा नळयोजनेच्या दाबनलिकेला गळती लागल्यास ती दुरुस्त करण्यासाठी खोळंबा होतो. त्यावेळी तर चार-पाच दिवसांतून एकदा पाणी दिले जाते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पंचगंगा नदीतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून पाणी अडविण्यात आले. मात्र, या पाण्यात नदीकाठावरील दोन्ही बाजूंची शहरे व गावांचे सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी मिसळल्याने पाण्यातील दूषितपणाची तीव्रता वाढली. जलपर्णीची बिजे प्रदूषित पाण्यातच रूजत असल्याने आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच पंचगंगेच्या पाण्यावर जलपर्णीच्या बिजांचा हिरवट तवंग पसरला . (प्रतिनिधी)नदी, कूपनलिका : पाण्याचे नियंत्रण हवेशहरास पाणीटंचाईचा आगामी धोका पाहता नदी व कूपनलिकांच्या पाण्यावर आता नियंत्रण आणावे लागणार आहे. कृष्णा नळपाणी योजनेची दाबनलिका आणि शुद्धीकरण झालेले पाणी वितरण करणारी नलिका यांच्यावरील गळती युद्धपातळीवर काढण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करावी. या गळती काढण्यासाठी फेब्रुवारी ते जून या महिन्यांकरिता दाबनलिकेसह प्रत्येक टाकीच्या वितरण नलिकांसाठी स्वतंत्र ठेका द्यावा लागेल, असे मत नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी व्यक्त केले. तसेच कूपनलिकांचे पाणी सोडण्याचे नियंत्रण आता नगरपालिकेने आपल्या हाती घेतले पाहिजे. कूपनलिकांवर ‘टाईमर’सारखी यंत्रणा बसवून ठरावीक वेळेलाच पाणी सोडले पाहिजे; अन्यथा उन्हाळ्यात भूजल स्तर खालावून अनेक कूपनलिका कोरड्या पडण्याचा धोका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘पंचगंगे’वर जलपर्णीचा तवंग
By admin | Published: January 15, 2016 12:49 AM