म्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्नामुळे व्यथित झालेल्या किसान सभेने चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रशासनावर दबाव गट निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी या खोºयातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन लोकलढा उभारण्यासाठी हाक दिली आहे. तर, राजकीय बॅनर, पक्षाचा झेंडा खाली ठेवून चिकोत्रातील जलसमृद्धीसाठी एकसंध राहण्यासाठी येथील ग्रामस्थांनी साद घातली आहे. त्यामुळे तब्बल २२ वर्षांपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही असंघटितपणामुळे लोकचळवळ उभारू शकलेली नव्हती. पहिल्यांदाच चिकोत्रा जलतृप्ती लोकलढा उभारला जातोय.
१९९६ मध्ये चिकोत्रा खोऱ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहून प्रशासनाने कागल तालुक्याच्या दक्षिणेकडे आजरा तालुक्याच्या हद्दीत झुलपेवाडी येथे चिकोत्रा (झुलपेवाडी) धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरतच नाही. परिणामी, ऐन उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण ठरलेलीच असते.धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी राजकीय पातळीवर विचारविनिमय आणि प्रशासनाने प्रयत्न केलेच नाहीत, असे नाही. परंतु, हे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. या चिकोत्रा खोऱ्यात आजरा, भुदरगडसह कागलमधील ३५ गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावात राजकीय गटतटासह अनेक मंडळे कार्यरत आहेत. परंतु, येथील जनतेला भेडसावणाºया पाणीप्रश्नाबाबत एकदाही व्यापक जनआंदोलन उभारले गेले नाही. या धरणाची क्षमता अवघी दीड टीएमसी इतकीच आहे. जर, हे पूर्ण क्षमतेने भरले तर ३५ गावांच्या पिण्यासह ५ हजार ६२० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे हे धरण भरतच नाही. यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. यासाठी लोकचळवळीचा लढा तीव्र करून प्रशासनावर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.गावकऱ्यांची अशीही कृतज्ञता...चिकोत्रा खोºयातील पाणीप्रश्नाबाबत किसान सभेने पुकारलेल्या लोकलढ्याला सर्वच ३५ ग्रामपंचायत प्रशासनाने प्रतिसाद दिला आहे. किसान सभेचे कार्यकर्ते यासाठी जंग-जंग पछाडत आहेत. पदरमोड करून प्रबोधन करणाºया या कार्यकर्त्यांचे गावागावांत स्वागत होत आहे. काही गावांत त्यांचे चहापान, तर काही गावकरी त्यांच्या माध्यानभोजनाची व्यवस्था करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत.असे होणार ठरावहेळ्याचा देव, भावेश्वरी मंदिर परिसर, आरळगुंडी, म्हातारीचे पठार, शिवारबा पठार येथून वाया जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळवणे तसेच, नागणवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून हे धरण तत्काळ पूर्ण करावे या मागण्या १ मेच्या चिकोत्रा खोºयातील ३५ गावांतील ग्रामसभेत करून त्याचे ठराव किसान सभेकडे एकत्रित करण्यात येणार आहेत. तर किसान सभा हे ठराव जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग, तसेच पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना देऊन पाठपुरावा करणार आहे.